Mon, Jun 24, 2019 21:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चार दिवस  जोर‘धार’

चार दिवस  जोर‘धार’

Published On: Jun 25 2018 1:49AM | Last Updated: Jun 25 2018 1:42AMपुणे/मुंबई/ठाणे : प्रतिनिधी

मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून, संततधार पावसाने मुंबईचा वीक एंड रविवारी घरीच साजरा झाला. तर रविवारी सायंकाळपर्यंत ठाण्यात 100 मिमी पावसाची नोंद झाली. पुढील चार दिवस मुंबईसह राज्यभर जोरधार बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

मुंबईच्या पश्‍चिम उपनगरांतील अनेक सखल भागांत पाणी साचले आणि वाहतूक ठप्प झाली. शनिवारनंतर दुसर्‍या दिवशीही संततधार कायम राहिल्याने मुंबईकरांना रविवारची सुट्टी घरातच घालवावी लागली.

पश्चिम उपनगरातील अपूर्ण नदी व नालेसफाईमुळे बहुतांश सखल भाग जलमय झाला होता. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्‍वरी, अंधेरीसह वांद्रेपर्यंतच्या रस्त्यावर पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. मध्येच वाहने बंद पडल्याने काही वाहनचालकांना धक्का मारतच घर गाठावे लागले.  रेल्वेसेवेवरही पावसाचा परिणाम दिसून आला. यामुळे चाकरमान्यांचे काही प्रमाणात हाल झाले. बेस्ट बसचा वेगही मंदावला होता.

दक्षिण मुंबईत रविवारी पावसाचा जोर दुपारपर्यंत कमी होता पण संध्याकाळनंतर जोरदार वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरू झाला होता. थोडया पावसाने देखील हिंदमाता,परेल,दादर,कुर्ला, अंधेरी या नेहमीच्या ठिकाणी पावसाचे पाणी नेहमी साठुन रहायचे.परंतु शनिवारपासुन संततधार असणार्‍या पावसाने पाणी साठ्ण्याचा प्रकार कुठेच न झाल्याने मुंबईकरांना यावेळी दिलासा मिळाला.

ठाण्यात रविवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. सकाळी 9 पर्यंत पावसाचा आवेग कमी-अधिक होता; परंतु दुपारी 12 नंतर संततधार सुरू होती. सकाळी झालेली 25.86 मिलीमीटर पावसाची नोंद सायंकाळपर्यंत 100 मिमीवर पोहोचली. पावसामुळे झाडांच्या फांद्या पडल्याच्या 22 तक्रारी आल्या. ठाणे येथील 12 बंगला येथे झाड उन्मळून पडल्याची घटना दुपारी 2.30 च्या सुमारास घडली. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दलाच्या वतीने पडलेले झाड तत्काळ हटविण्यात आले. दुपारी 5 च्या सुमारास पावसाचा वेग मंदावला. पण 6.30 च्या सुमारास पुन्हा पावसाचा वेग वाढला. 

नैऋत्य मोसमी वार्‍यांना (मान्सून) पोषक वातावरण तयार झाल्याने मान्सूनची जोरदार प्रगती सुरू आहे. रविवारी मान्सूनची सीमा उत्तरेकडे सरकली असून, पुढील 48 तासांत राज्याचा उर्वरित भागही मान्सून व्यापणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत म्हणजेच 25 ते 28 जूनदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अणि विदर्भात मुसळधार ते जोरदार पाऊस होईल. तर कोकणातील काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात 14 दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारपासून मान्सूनने सुरू केलेली प्रगती रविवारीही कायम होती. मान्सूनने रविवारी उत्तरेकडे वाटचाल सुरू केली. कोकण किनारपट्टीचा संपूर्ण, तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापत मान्सून गुजरातमध्ये दाखल झाला. रविवारी मान्सूनने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा पूर्ण भाग व्यापला. विदर्भातील अमरावती आणि गोंदियापर्यंत मान्सूनने मजल मारली. तर, गुजरातमधील वेरावळ, अमरेली, अहमदाबाद, मध्य प्रदेशातील खांडवापर्यंत मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.