Sat, Feb 16, 2019 04:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ​​​​​​​तुंबईची कार्यालये ओस 

​​​​​​​तुंबईची कार्यालये ओस 

Published On: Jul 04 2018 2:16AM | Last Updated: Jul 04 2018 1:40AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई शहर व उपनगरात मंगळवारी पहाटेपासून धो-धो पाऊस सुरू झाला. त्यामुळे सकाळीच सायन, गांधी मार्केट, माटुंगा, हिंदमाता, एल्फिन्स्टन, वांद्रे, सांताक्रूझ, कुर्ला, मिलन, सांताक्रूझ सबवे पाण्याखाली गेले होते. 

सकाळी 7.40 वाजता अंधेरी रेल्वे स्टेशन येथे पादचारी पूल कोसळल्यामुळे पश्‍चिम रेल्वेची उपनगरीय सेवा पूर्णपणे ठप्प पडली. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी बोरिवली, गोरेगाव, वांद्रे भागातून सोडण्यात आलेल्या जादा बस व मिळेल त्या वाहनाने प्रवास करून आपले घर गाठले. 

विरार-वसई, मीरा-भाईंदर भागातून कामानिमित्त मुंबईत येणार्‍या प्रवाशांनी घरीच राहणे पसंत केले. जे चाकरमानी सकाळी कामावर जाण्यास निघाले होते, ते पुन्हा गोरेगाव, बोरिवली येथून तब्बल दोन ते तीन तासांनंतर घरी पोहोचले. तर दुसरीकडे सायन व माटुंगा येथील रेल्वेमार्गात पाणी तुंबल्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत झाली. गाड्या तब्बल 30 ते 40 मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे सकाळी चाकरमानी कामावर पोहोचू शकले नाहीत. पाऊस व तुंबलेले पाणी व अंधेरीचा अपघात यामुळे पश्‍चिम द्रुतगती महामार्गासह, अंधेरी-कुर्ला रोड, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, एस. व्ही. रोड, सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता, लिंक रोड, एल. बी. एस. मार्ग, सायन, परळ व लालबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लालबाग व जे. जे. उड्डाणपूल एवढेच नाही तर फ्रीवेवरही मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे तासाभराचा प्रवास तीन ते चार तासांवर गेला. उपनगरीय रेल्वे बंद असल्यामुळे लोकलने प्रवास करणारा प्रवासीही रस्त्यावर आला.