Wed, May 22, 2019 20:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगडला पुराचा तडाखा

रायगडला पुराचा तडाखा

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 12:43AMरायगड : विशेष प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून महाड, माणगाव, रोहा, पोलादपूर, कर्जत खालापूर, सुधागड या तालुक्यांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे.  महाडमध्ये सावित्री, माणगाव काल, रोहा कुंडलिका, सुधागडमधील आंबा आदी नद्यांना महापूर आल्याने जवळपास 500 गावांना त्याचा फटका बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. महाडमधील सावित्री नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या वरच्या बाजूपर्यंत पाणी आले होते. 

महाड तालुक्यातील 70 ते 80 गावे, माणगाव 100, रोहा सुधागडमध्येही जवळजवळ 50 ते 60 गावांना पुराच्या पाण्याने चांगलीच झळ बसली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाकड येथे पाणी आल्यामुळे महामार्ग ठप्प झाला होता. सकाळी 11 वाजल्यापासून जवळपास  सायंकाळपर्यंत वाहतुक ठप्प होती. 

मुंबई गोवा महामार्गावर अनुक्रमे माणगाव, वाकण या दोन पुलांवर पाणी आले होते.याशिवाय माणगांव तालुक्यात माणगांव श्रीवर्धन मार्गावर मोर्बे येथे, माणगांव पुणे मार्गावर निजायपूर येथे, तर महाडमध्ये गांधारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने बिरवाडी, कुर्ले मार्ग बंद झाला होता. सुधागड जांभूळपाडा मार्गावर पाणी आल्याने 10 गावांचा संपर्क तुटला होता. शुक्रवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सावित्री नदी, आंबा नदी तसेत इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पाणी शिरले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुरक्षेच्या दृष्टीने आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

सतत पडत असलेला मुसळधार पावसामुळे जिल्ह्यांत ठिकठिकाणी पाणीच पाणी दिसून येत आहे. शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर कायम ठेवला आहे. महाड शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने या शहराला जोडणारे दोन रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच महाड ते रायगड वाहतूक देखील बंद करण्यात आल्याने या भागातून जाणार्‍या वाहनांचा खोळंबा झाला आहे. महाड बाजारपेठेत देखील पाणी शिरल्याने दुकानांचे नुकसान झाले आहे.

सावित्री नदीची धोकापातळी 6.50 मीटर असून आता पाण्याच्या पातळी 6.60 मीटरवर पोहोचली आहे. शहरातील दस्तुरी नाक्यावर पाणी आले असून महाड ते रायगड रस्ता पाण्याखाली गेला आहे. नाते रस्ताही पाण्याखाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर महाड शहराला पुराचा मोठा फटका बसू शकतो. महाड नगरपालिकेने शहरातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. तसेच सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

महाड शहराजवळील गांधारी नदीवरील पुल पाण्याखाली गेला आहे. तसेच महाड बाजारपेठ, भाजी मंडई, दस्तुरी भागात पाणी भरण्याची शक्यता आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणार्‍या जुन्या हायवे वरती कलोते भागात रोडवर पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे एक्स्प्रेस हायवेवरील व जुन्या हायवेवरील वाहतूक संथ गतीने चालू असून सदर ठिकाणी वाहतूक कर्मचारी नेमण्यात आले आहेत.