Sun, Jul 21, 2019 06:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उष्णतेची लाट दाखल

उष्णतेची लाट दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई/पुणे : प्रतिनिधी 

हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरवत मंगळवारी उष्णतेची लाट मध्य महाराष्ट्रात दाखल झाली. तीव्र उकाड्यामुळे मध्य महाराष्ट्रातील नागरिक अक्षरश: होरपळून निघाले. नगर येथे राज्यातील उच्चांकी 41.1 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले, तर पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक येथील कमाल तापमान 38 ते 40 अंशांच्या दरम्यान नोंदविले गेले. 

पूर्व विदर्भात शुक्रवारी (दि. 30) उष्णतेची लाट येणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबई, कोकणात सरासरी 35, विदर्भात सरासरी 38, मराठवाड्यात सरासरी 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दक्षिण कोकण, गोव्याच्या काही भागात व उत्तर कोकणच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मंगळवारी उल्लेखनीय वाढ झाली, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

पुणे 17.6, मुंबई 24.5, कोल्हापूर 23.6, सांगली 23, सातारा 20, सोलापूर 23, औरंगाबाद 19, नागपूर येथे 17.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईचा पारा वाढताच आहे. मंगळवारी मुंबईतील सांताक्रुझ येथे 39 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवण्यात आले असून कुलाबा येथे काहीसे घट झालेले 37 अंश सेल्सिअस  तापमान नोंदवण्यात आले. 

दोन दिवसांपासून मुंबई चांगलीच तापली आहे. तापमानामध्ये अचानक वाढ झाल्यामुळे थंड पदार्थांचा शरीरावर भारंभार मारा करू नका, असा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. बुधवारीही मुंबईचे तापमान 35 अंशापर्यंत खाली येईल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

Tags : mumbai news, Heat waves, entered, central Maharashtra, 


  •