Mon, Nov 19, 2018 02:33



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समीर भुजबळांच्या जामीन  अर्जावर आज सुनावणी 

समीर भुजबळांच्या जामीन  अर्जावर आज सुनावणी 

Published On: Jun 06 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 2:00AM



मुंबई : राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत  गेली दोन वर्षे अटकेत असलेल्या समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी हायकोर्टने 6 जूनपर्यंत तहकूब ठेवली. या अर्जाला विरोध करणार्‍या ईडीचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी हा निर्णय घेतला. महाराष्ट्र सदन बांधकाम, कालीना येथील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे बांधकाम, अंधेरी आरटीओ प्रकरण, मुंबई नाशिक हायवे टोल, वांद्रे येथील एमआयजी कॉलनी, नवी मुंबई हेक्स वर्ल्ड गृहप्रकल्प अशा अनेक प्रकल्पांतून भुजबळ कुटुंबीयांनी केलेल्या सुमारे 840 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांना अटक केली. गेल्याच आठवड्यात छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर समीर भुजबळ यांनी  जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज न्यायालयात प्रलंबित होता. छगन भुजबळ यांच्या जामिनाविषयीच्या आदेशाची प्रत उपलब्ध होताच समीर यांनाही तातडीने जामीन मंजूर करण्याची विनंती करणारा अर्ज अ‍ॅड.एस.के.सक्सेना यांनी उच्च न्यायालयात केला होता. त्या अर्जावर  न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर आज सुनावणी झाली. या अर्जाला अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंग यांनी जोरदार विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार घेण्यात आला आहे त्या पीएमएल कायद्यात नव्याने दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार जामीन देता येणार नाही असा दावा केला. हा युक्तिवाद आज अपूर्ण राहिल्याने न्यायालयाने जामीन अर्जाची सुनावणी उद्या 6 जूनपर्यंत तहकूब ठेवली.