Tue, Mar 26, 2019 20:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईची वैद्यकीय सेवा महागली

मुंबईची वैद्यकीय सेवा महागली

Published On: Feb 03 2018 2:46AM | Last Updated: Feb 03 2018 2:44AMमुंबई : प्रतिनिधी 

झोपडपट्टी व म्हाडाच्या इमारतींना नियमित दराने पाणी पुरवठ्याचे गाजर दाखवत, पालिका हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवांमध्ये 20 ते 30 टक्के वाढ करण्याची घोषणा मुंबई महापालिकेच्या 2018-19 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे केईएम, नायर व सायन या प्रमुख हॉस्पिटलसह अन्य उपनगरीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणार्‍या सामान्य मुंबईकरांसह राज्यातील गरीब रुग्णांना मोठा फटका बसणार आहे.

मुंबई महापालिकेचा 2018-19 चा अर्थसंकल्प शुक्रवारी आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना सादर केला. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सूचवण्यात आलेली नाही. यावेळी जकातीमधून मिळणारे उत्पन्न बंद झाल्यामुळे आर्थिक गणित कोसळलेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पात घट होईल, असे वाटत होते. पण 2017-18 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2018-19 मध्ये अर्थसंकल्पात 2 हजार 117 कोटी रुपयाने वाढ झाली आहे. 2017-18 मध्ये पालिकेचा अर्थसंकल्प 25 हजार 141 कोटी रुपये होता. 2018-19 मध्ये हा अर्थसंकल्प 27 हजार 258 कोटी 7 लाख रुपयापर्यंत पोहचला आहे. यावेळी रस्ते, पूल, पाणी, शिक्षण आरोग्य, अग्निशमन, गलिच्छ वस्ती सुधारणा, कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, प्राथमिक शाळा दुरूस्त्या, बाजार, घन:कचरा, मलनि:सारण वाहिनी, पर्जन्य जलवाहिनी, माहिती तंत्रज्ञानसाठी तब्बल 9 हजार 527 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तूलनेत यावेळी तब्बल 1 हजार 400 कोटी 88 लाख रुपयाची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.

महसूली उत्पन्नात जकातीपोटी सरकारकडून 8 हजार 401 कोटी रुपये मिळतील असे अपेक्षित धरण्यात आले आहे. त्याशिवाय मालमत्ता     करातून 5 हजार 206 कोटी रुपये, विकास नियोजनातून 3 हजार 947 कोटी रुपये, जल आकारातून 1 हजार 357 कोटी रुपये व अन्य उत्पन्न असे 23 हजार 985 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळेल असे अपेक्षित धरण्यात आले आहे. दरम्यान अर्थसंकल्पाचा ताळमेळ बसवत असताना, पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी झोपडपट्टी व म्हाडाच्या इमारतींना नियमित दराने पाणी पुरवठा करण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र देईपर्यंत मालमत्ता कराची थकबाकी असली तरीही कर थकबाकीचा भार विक्रीयोग्य भागावर टाकून पुनर्वसित इमारतींना नियमित दराने जलजोडणी देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पातील या निर्णयामुळे झोपडपट्टी व म्हाडाच्या इमारतीत राहणार्‍या सुमारे 40 ते 45 लाख रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. पण आयुक्तांनी दुसरीकडे पालिका हॉस्पीटलमधील वैद्यकीय सेवा शुल्कात मुंबईतील रूग्णांसाठी 20 टक्के व मुंबई बाहेरील रूग्णांसाठी 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 2001 पासून वैद्यकीय सेवांच्या शुल्कात वाढ करण्यात आली नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याचे यावेळी पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे पालिका हॉस्पीटलमध्ये दररोज उपचार घेणार्‍या 25 ते 30 हजार गरीब रूग्णांचे आर्थिक गणितच बिघडणार आहे.