Sun, Jul 21, 2019 12:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अलिबागेतील नीरव मोदीच्या बंगल्यावर हातोडा

अलिबागेतील नीरव मोदीच्या बंगल्यावर हातोडा

Published On: Dec 07 2018 1:48AM | Last Updated: Dec 07 2018 1:12AM
मुंबई : प्रतिनिधी

पीएनबी प्रकरणातील फरार मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रकिनार्‍यावरील बंगल्यावर अखेर हातोडा चालवण्यात आला. बेकायदा बांधकाम पाडण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली. तर अन्य स्थानिकांच्या 58 बंगल्यांवर लवकरच कारवाई केली जाईल, अशी हमी  राज्य सरकारने न्यायालयात दिली.

अलिबाग समुद्रकिनार्‍यावर भरती आणि ओहोटीच्या रेषेत अनधिकृत बांधकामे झाली असून यात धनदांडग्यांचे बंगले आहेत. ही बांधकामे पाडण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र ढवळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील, न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. 

मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने या बंगल्यांना अभय देणार्‍या महसूल अधिकार्‍यांचा समाचार घेतला. न्यायालयाच्या आदेशानंतरही बेकायदा बांधकांमावर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला. याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी  केलेल्या कारवाईचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार कारवाई करून सर्व  बेकायदा बांधकामांविरोधात नोटीस बजावली आहे. त्यापैकी सुमारे 61  बंगल्यांच्या  मालकांनी न्यायालयात धाव घेऊन ‘जैसे थे’ आदेश मिळवला आहे. तर काही बंगल्यांच्या मालकांनी नोटिशीला उत्तर दिले आहे. मात्र, 58 स्थानिकांनी याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत.  त्यांच्याविरोधात लवकरच कारवाई केली जाईल, अशी हमी अ‍ॅड.प्रियभूषण काकडे यांनी न्यायालयाला दिली.