Sun, Aug 25, 2019 04:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहून गेलेल्या हर्षलचा मृतदेह 3 किमी अंतरावर सापडला

वाहून गेलेल्या हर्षलचा मृतदेह 3 किमी अंतरावर सापडला

Published On: Jul 13 2018 1:24AM | Last Updated: Jul 13 2018 12:51AMडोंबिवली : वार्ताहर

मंगळवारच्या रात्री 9 च्या सुमारास डोंबिवलीजवळच्या नांदीवली येथील तुडूंब भरलेल्या नाल्यात तोल जाऊन पडलेल्या हर्षल जिमकल (24) या तरुणाचा दोन दिवस शोध लागला नव्हता. मात्र वाहून गेलेल्या हर्षलचा मृतदेह गुरुवारी सकाळी 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या आयरे गावातल्या ज्योतीनगर येथील नाल्यात आढळून आला. बेपत्ता झालेल्या हर्षलचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच तो राहत असलेल्या गांधीनगरमधील जय मुक्ता सोसायटीवर शोककळा पसरली आहे.

क्लासहून परतत असताना नांदीवली येथील नाल्याजवळ हर्षल हा लघुशंका करण्यासाठी गेला होता. सोबत त्याचे दोन मित्र देखील होते. हर्षलचा पाय घसरला आणि तो मुसळधार पावसामुळे दुथडीभरून वेगाने वाहणार्‍या नाल्यात पडला. हे पाहून दोन्ही मित्रांनी आरडाओरड करत हर्षलचा पाठलाग केला. मात्र काही वेळातच तो नाल्यात दिसेनासा झाला. मित्रांनी घरच्यांना हा प्रकार फोन करून कळविला. आसपासच्या तरुणांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी नाल्यात त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र हर्षल कुठेही आढळून आला नाही.

150 मिमी इतका तुफान पाऊस, नाल्याच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह, कोपर खाडीपर्यंत जाणार्‍या या नाल्याच्या मोठा विस्तार, दोन्ही किनार्‍यांना असलेली घनदाट झाडी, प्रचंड चिखल या सगळ्याची पर्वा न करता महसूल यंत्रणेने इतर यंत्रणांच्या मदतीने ही मोहीम अविश्रांत राबविली होती. अखेर वाहून गेलेल्या हर्षलचा मृतदेह गुरुवारी सकाळी अथक प्रयत्नानंतर बचाव पथकांच्या हाती लागला. 

पोलिसांनी पंचनामा करून हर्षलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठविला. त्यानंतर  हर्षलचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. हर्षलचा मृतदेह पाहून त्याच्या माता-पित्याने हंबरडाच फोडला. हर्षलच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या कुटुंबियांसह मित्रमंडळींमध्येही शोककळा पसरली आहे. हर्षलच्या मृतदेहावर दत्तनगरमधल्या शिवमंदिर मोक्षधाम येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या संपूर्ण बचाव मोहिमेत स्वत: बारकाईने लक्ष घातले होते. निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, प्रांत अधिकारी प्रसाद उकर्डे, तहसीलदार अमित सानप यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक यंत्रणा, नेव्ही, पोलीस, ठाणे पालिकेचे आपत्ती दल यांच्यात समन्वय ठेवून ही शोध मोहीम राबवण्यात आली.