Sat, Jul 20, 2019 09:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हँकॉक पूलाच्या भूमिपूजनावरून सेना-काँग्रेस आमनेसामने

हँकॉक पूलाच्या भूमिपूजनावरून सेना-काँग्रेस आमनेसामने

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 27 2018 1:24AMमुंबई : प्रतिनिधी 

माझगाव येथील मध्य रेल्वेमार्गाला ओलांडणार्‍या हँकॉक पुलाच्या भूमिपूजनावर शिवसेना-काँग्रेस आमने-सामाने आली आहे. येथील काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविकांना शेवटपर्यंत अंधारात ठेवून, सत्ताधारी शिवसेनेच्या सांगण्यावरून पालिकेने घाईगडबडीत सोमवारी पालिकेने हँकॉक पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकला. त्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून काँग्रेसने मंगळवारी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

ब्रिटिशकालीन हँकॉक पूल पाडून तो नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या पुलाच्या भूमिपूजनाचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार या भूमिपूजनाला राजशिष्टाचारानुसार कोणाला आमंत्रण द्यावे, याची विचारणा जनसंपर्क विभागाकडे करण्यात आली. जनसंपर्क विभागानेही राजशिष्टाचारानुसार कार्यक्रमपत्रिकेवर कोणाचे नाव कुठे असावे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थानिक नगरसेवकांना देण्यात यावे, आदी माहिती देण्यात आली. त्यामुळे या भूमिपूजनाची आगाऊ माहिती पालिकेच्या पूल विभागाने स्थानिक नगरसेवकांना देणे बंधनकारक होते. पण येथील काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सोनम जामसूतकर व निकिता निकम यांना कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी साडेपाच वाजता आमंत्रण पत्रिका देण्यात आली.

सोमवारी सकाळी 11 वाजता कार्यक्रम असतानाही रविवारी दुपारपर्यंत आमंत्रण पत्रिका छापल्या नसल्याचे समजते. अखेर घाईगडबडीत पत्रिका छापून त्याचे रविवारी रात्री वाटप करण्यात आले. दरम्यान आपल्या विभागात भूमिपूजन होत असताना, त्याचे आदल्या दिवशी निमंत्रण मिळत असल्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे जामसूतकर व निकम या दोन्ही नगरसेविकांनी सांगितले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची महापौरांनाही रविवारी सायंकाळपर्यंत माहिती नव्हती. महापौरांच्या दैनंदिन कार्यक्रमामध्येही या कार्यक्रमाचा उल्लेख नव्हता. 

अखेर सोमवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या शुभहस्ते या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खासदार अरविंद सावंत, सभागृह नेते यशवंत जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला काँग्रेस नगरसेविकांनी बहिष्कार टाकला. एवढेच नाही तर, काँग्रेसने मंगळवारी आमदार अमिन पटेल, माजी आमदार मधू चव्हाण यांच्या शुभहस्ते या पुलाचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. पालिका प्रशासनाने राजशिष्टाचार पायदळी तुडवला असून यामागे शिवसेनेचा हात असल्याचा आरोप माजी नगरसेवक मनोज जामसूतकर यांनी केला आहे.