Sun, Mar 24, 2019 04:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हँकॉक ब्रिज पाडून दोन वर्षे झाली, नव्या पुलास विलंब का?

हँकॉक ब्रिज पाडून दोन वर्षे झाली, नव्या पुलास विलंब का?

Published On: Jan 16 2018 2:13AM | Last Updated: Jan 16 2018 12:53AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

ब्रिटिशकालीन हँकॉक ब्रिज पाडून दोन वर्षे उलटली तरी त्या जागी पर्यायी पादचारी पूल उभारण्यास दिरंगाई करणार्‍या पालिका आणि रेल्वे प्रशासनाला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले.  आधीच विलंब झालेल्या या ब्रिजच्या उभारणीला आणखी दीड वर्षाचा कालावधी कशासाठी ? असा संतप्त सवाल न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठाने करून महापालिकेला या ब्रिजचा कृती आराखडा दोन दिवसात सादर करा, असे निर्देश महापालिकेला देऊन याचिकेची पुढील सुनावणी बुधवारी 17 जानेवारीला ठेवली आहे.

सॅण्डहर्स्ट रोड आणि भायखळा स्थानकांदरम्यानच्या हँकॉक ब्रिजच्या जागी अद्यापि पादचारी पूल बांधकामाला सुरुवात करण्यात आलेली नाही़  त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे रूळावरून चालण्याव्यतिरिेक्त दुसरा पर्याय नाही़ यात अनेक निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत,  याकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका अ‍ॅड. कमलाकर शेणॉय यांनी उच्च न्यायालयात दाखल आहे़

त्या याचिकेवर न्यायमूर्ती  नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी मुंबई महापालिकेने ब्रिजच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यास 11 महिन्याचा कालावधी लागेल. त्यावरून नागरिकांना चालत जाता येईल . मात्र ब्रिज पूर्ण करण्यास 19 महिन्यांचा कालावधी लागेल, असे पालिकेने सांगताच न्यायालयाने संताप व्यक्त केला.  एवढ्या दिवसात हा ब्रिज का पूर्ण झाला नाही, असा सवालही न्यायालयाने केला. 

न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या तीन महिन्यात काय केले. या ब्रिजचा कृती आराखउा बुधवारी सादर करा, असे आदेश देताना पालिका अधिकार्‍यांना न्यायालयात हजर राहाण्यासही बजावले.