Mon, Jul 15, 2019 23:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शौचकुपात पडलेला मोबाईल काढताना  अडकला  हात!

शौचकुपात पडलेला मोबाईल काढताना  अडकला  हात!

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 1:32AMकुर्ला : वार्ताहर

शौचकुपात पडलेला मोबाईल उचलण्याच्या नादात स्वतःचा हात तब्बल पाच तास शौचकुपात अडकवून घेतल्याची घटना कुर्ला परिसरात सोमवारी सकाळी घडली. रोहित नंदलाल राजभर (19) या तरुणाला अग्‍निशमन दलाने शौचालय तोडून त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढले. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.

कुर्ल्यातील मसरानी लेन, गौरीशंकर सोसायटीमध्ये राहणारे नातेवाईक लालमणी श्रीमूरत वर्मा यांच्याकडे तो आला होता. सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान घरातील शौचालयात शौचास गेला असता  तिथे त्याच्या खिशातील अँड्रॉइड मोबाईल शौचकुपात पडला. त्याने मोबाईल काढण्यासाठी शौचकुपात हात घातला. परंतु हातात कडा असल्याने मोबाईलसह हात असा अडकला की बाहेर काढणे अशक्य झाले होते.

आरडाओरड केल्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. प्रयत्न करूनही त्यांना शक्य झाले नाही. अखेर त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण शौचालय तोडून तरुणाची सुटका केली. सुदैवाने त्याच्या हाताला फार मोठी इजा झाली नाही. विनोबा भावे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली आहे. घाबरलेल्या स्थितीत रोहितने त्वरित उत्तर प्रदेश  गाठले. तर मुंबईत या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे.