Wed, May 22, 2019 15:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दीड लाख पोस्ट कार्यालये ठप्प

दीड लाख पोस्ट कार्यालये ठप्प

Published On: Feb 24 2018 1:36AM | Last Updated: Feb 24 2018 1:25AMठाणे : दिलीप शिंदे

पोस्टाचा कारभार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी भारतीय टपाल खात्याने अर्थात पोस्टाने सीएसआय ही नवीन ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित केली. मात्र  काही दिवसांमध्येच ही यंत्रणा कोलमडली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील 1 लाख 55 हजार 15 पोस्ट कार्यालयांमधील बचत योजनांची कामे ठप्प  झाली. तसेच  गॅस बिलेही स्वीकारली जात नसल्याने कर्मचार्‍यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 

देशातील सर्वात मोठ्या रिटेल नेटवर्क असलेल्या पोस्टाने आपली सेवा बँकांप्रमाणे अधिक तत्पर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पोस्टाचे संगणकीकरण करताना फिन्याकल संगणक प्रणाली विकसित केली. त्यापुढे जाऊन जानेवारी महिन्यात पोस्टाचा संपूर्ण कारभार ऑनलाईन व्हावा, याकरिता सीएसआय ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे ठाण्यातील एका पोस्ट कार्यालयातील संपूर्ण आर्थिक व्यवहार हा दिल्लीतील मुख्यालयातही पाहण्याची सोय झाली. मात्र ही प्रणाली कार्यान्वित करताना पोस्टाच्या कामाचा आवाका आणि त्याच्या व्याप्तीचा योग्य अभ्यास न झाल्याने काही दिवसांत मुख्य सर्व्हर बंद पडलेआणि गेल्या दोन दिवसांपासून पोस्टाचे कामकाज ठप्प झाले. या संगणक प्रणालीवर डेटा ओव्हरलोड झाल्याने मुख्य सर्व्हर बंद पडू लागला आहे. हे सर्व्हर कर्नाटकमधील म्हैसूर येथे आहे. हे सर्व्हर दुरूस्त करण्यास संबंधित कंपनीला अपयश आल्याने गुरूवारपासून देशभरातील पोस्टातील सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व प्रकारचे पार्सल प्रथम पोस्ट मास्तरांना दाखवणे बंधनकारक आहे, अशा नोटिसा पोस्ट कार्यालयांमध्ये लावण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपासून तांत्रिक कारण दिले जात असल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून प्रसंगी कर्मचार्‍यांना ग्राहकांच्या नाहक रोषाचा फटका बसू लागला आहे.