Mon, Nov 19, 2018 17:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हज यात्रेच्या अनुदानबंदीवर राज ठाकरेंचे व्यंगचित्र

हज यात्रेच्या अनुदानबंदीवर राज ठाकरेंचे व्यंगचित्र

Published On: Jan 20 2018 8:42AM | Last Updated: Jan 20 2018 8:42AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समर्थन केले आहे. त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली असून आता पंतप्रधानांनी देशातील बांगलादेश आणि पाकिस्तानी घुसखोरांची हकालपट्टी करावी, असा सूचक संदेश राज यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून दिला आहे. 

‘(अनु)दान आणि (राष्ट्र)धर्म’ असे शीर्षक देऊन त्यांनी हे व्यंगचित्र  फेसबुक पेजवरुन पोस्ट केले. या व्यंगचित्रात  भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधते, असे दाखवण्यात आले आहे. भारतीय हज यात्रेकरू पंतप्रधान मोदी यांच्या मागे उभे आहेत. 'ते योग्यच आहे. देशात इतरही खूप फुटकळ अनुदाने आहेत. तीपण काढून घ्या' असे भारतमाता पंतप्रधानांना सांगताना दाखवण्यात आले आहे.

बांगलादेश आणि पाकिस्तानी अतिरेक्यांना मदरसे अभय देत असल्याचा घणाघाती आरोप देखील त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून केला आहे. ‘भारतातील अतिरेकी घडवणारे मदरसे’ या ओळीतून त्यांनी देशातील अतिरेक्यांवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.  

हज यात्रेला मिळणारे अनुदान बंद झाल्यानंतर काशी, अयोध्या, मानसरोवर यात्रांवर करण्यात येणाऱ्या खर्चाबाबत प्रश्न ओवेसी यांनी विचारला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी  व्यंगचित्र काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.