Tue, Apr 23, 2019 10:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हाफकिनला औषधनिर्मितीसाठी १०० कोटी

हाफकिनला औषधनिर्मितीसाठी १०० कोटी

Published On: Aug 25 2018 1:34AM | Last Updated: Aug 25 2018 1:32AMमुंबई :प्रतिनिधी

जागतिक दर्जाची ऐाषधे व जीव रक्षक लस तयार करण्यासाठी हाफकिन संस्थेला 100 कोटी रूपये उपलब्ध करून देण्यास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे. प्रशिक्षण, संशोधन व चाचणी  संस्थेसाठी नवीन इमारत बांधण्याकरीता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत  त्यांनी हा निर्णय जाहीर केला. हाफकिन इन्स्टीट्युटला भेडसावणार्‍या विविध अडीअडचणी संदर्भात ही बैठक घेण्यात आली. 

या संस्थेतुन दर्जेदार लस व औषधे तयार व्हावीत त्याचबरोबर संशोधन कार्यही व्हावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला पाहीजे. या संस्थेला विशेष दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून सहकार्य मिळविण्यात येणार आहे. संस्थेला जी कर्मचार्‍यांची कमतरता भासत आहे त्याबाबत खासगी तज्ञ सल्लागारांच्या मदतीने कंत्राटी पध्दतीने सेवा घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

औषध निर्मिती व संशोधन कामात गती यावी व त्याच्या संशोधनाला योग्य प्रकारे चालना मिळावी यासाठी नेमण्यात आलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारसींचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. कमीत कमी किंमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट यामध्ये ठेवण्यात आले आहे. हाफकीनच्या वतीने 2015-16 यावर्षाचा 1 कोटी 4 लाख 47  हजार रूपयांच्या लाभांशाचा धनादेश यावेळी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी संस्थेला मदत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. 

यावेळी हाफकिन इन्स्टिट्युट सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, सदस्य डॉ. आनंद बंग, वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख, हाफकीनच्या व्यवस्थापकीय संचालक संपदा मेहता, महाव्यवस्थापक सुभाष शंकरवार हे उपस्थित होते.