होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बारावीचा निकाल लांबणार!

बारावीचा निकाल लांबणार!

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 1:30AMमुंबई/पुणे : प्रतिनिधी 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीतीच चर्चा निष्फळ ठरल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार सोमवारी (दि. 26 मार्च) मंत्रालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतरही शासनाने मागण्या मान्य न केल्यास बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तपासलेल्या उत्तर पत्रिका व मार्कशिट बोर्डाकडे जमा न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यानुसार शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे राज्यातील सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांच्या 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून होत्या. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत तोडगा काढण्यासाठी महासंघाच्या पदाधिकार्‍यांना लेखी देत मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार विद्यार्थी हितासाठी संघटनेने पेपर तापसणीवरील बहिष्कार आंदोलन 5 मार्च रोजी मागे घेतले होते. मात्र, मागण्यांसंदर्भात बुधवारी (21 मार्च) अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्याने महासंघाद्वारे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 26 मार्च रोजी मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे. त्यानंतरही शासनाने मागण्या मान्य न केल्यास बारावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका आणि मार्कशिट बोर्डात जमा न करण्याचा निर्णय संघटनेद्वारे घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी दिली.

Tags : Mumbai, Mumbai news, HSC, results, delayed,