Tue, Jul 23, 2019 02:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 12 वीचा पेपर व्हायरल!

12 वीचा पेपर व्हायरल!

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 22 2018 12:58AMमुंबई : प्रतिनिधी

बारावी परीक्षेचा पहिलाच आणि तोही इंग्रजीचा पेपर सोलापूरमध्ये मोबाईलवर व्हायरल झाल्याने पेपरफुटीला आळा घालण्याचा दावा करणारे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तोंडघशी पडले, शिवाय   परीक्षा केंद्रात आलेल्या 13 विद्यार्थ्यांचे आणि दोन शिक्षकांचे मोबाईल मुंबई विभागीय मंडळाच्या भरारी पथकाकडून जप्‍त करण्यात आले.

गेल्यावर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणार्‍या प्रश्नपत्रिकेमुळे विशेष खबरदारी घेत वर्गातच 10 वाजून 50 मिनिटांनी प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्याचा निर्णय यंदा घेतला. इतके करूनही बुधवारी सोलापुरात अवघ्या तासाभरातच इंग्रजीचा पेपर फुटल्याने मंडळाची चांगलीच नाचक्की झाली आहे. 

शैक्षणिक करियरसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या बारावीच्या परीक्षेला राज्यात आजपासून सुरुवात झाली. बारावीचा पहिलाच इंग्रजीचा पेपर कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी सक्‍तीचा असल्याने सर्वच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी होती. पेपर सुरु झाल्यावर 12 वाजल्यानंतर    परीक्षा केंंद्रात आलेल्या आणि उशिरा येण्याचे योग्य कारण स्पष्ट न केलेल्या तब्बल 9 विद्यार्थ्यांचा प्रवेेश नाकारल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाकडून दिली. भरारी पथकांच्यामार्फत सकाळी मुब्रा परिसरातील परीक्षा केंद्रातील 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांकडील मोबाईल जप्‍त करण्यात आले.  अकरा वाजल्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेवून 61 विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांत प्रवेश दिला आहे. तर 12 ते 12.20 या वेळेत आलेल्या तब्बल 9 विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने प्रवेश नाकारला आहे. यामध्ये विक्रोळी, अंधेरी, भांडूप, भायखळा, रायगड जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

कॉपी रोखण्यासाठी नेमलेल्या आलेल्या पथकांकडून राज्यभरात 62 जणांना गैरमार्ग अवलंबताना पडकले आहे. अशी माहिती राज्य मंडळाने दिली आहे. यामध्ये सर्वाधिक21 विद्यार्थी अमरावीत विभागीय मंडळातील आहेत. त्या पाठोपाठ नाशिक विभागीय मंडळातील 11 विद्यार्थी कॉपी करताना सापडले आहेत.  नागपूर 10 विद्यार्थ्यांना पकडले आहे.

मुंबई विभागीय मंडळातून 3 लाख 30 हजार 849 विद्यार्थ्यांनी बुधवारी इंग्रजीचा पेपर दिला. परीक्षा केंद्रावर 10.30 च्या अगोदर पोहोचण्याची सक्‍ती विद्यार्थ्यांना केल्याने हॉलतिकीटावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर पालक आणि विद्यार्थी सव्वा दहा वाजता अनेक केंद्रावर गर्दी होती.