Wed, Jul 17, 2019 12:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कामत यांच्यामुळे मुंबई काँग्रेसला नवसंजीवनी!

कामत यांच्यामुळे मुंबई काँग्रेसला नवसंजीवनी!

Published On: Aug 22 2018 12:00PM | Last Updated: Aug 22 2018 11:59AMमुंबई : राजेश सावंत

काँग्रेसचे जेष्ठ नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने मुंबईसह महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुरुदास कामत यांच्यामुळे मुंबई काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही श्रद्धांजली वाहताना कामत यांनी काँग्रेस पक्ष मुंबईत मजबूत करण्यासाठी योगदान दिल्याचे म्हटले आहे. 

गुरुदास कामत हे २००३ ते २००८ या काळात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या नियुक्तीनंतर मुंबईत काँग्रेस मजबूत झाली. २००४ ते २००८ या काळात काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली.  मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असतानाही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची मोट बांधली. त्याच्या जोरावरच २००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. तसेच २००७च्या मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेसला यश मिळाले. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ६ पैकी मुंबईत काँग्रेसचे ५ तर राष्ट्रवादीचा १ खासदार निवडून आला. त्यात ते स्वत:देखील खासदार म्हणून निवडून आले होते. 

वाचा : काँग्रेसचे जेष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन

लोकसभाच नव्हे तर २००९च्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने घवघवीत यश मिळवले. काँग्रेसचे ३६ पैकी १८ आमदार निवडून आले. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामत यांना बॉस म्हणून हाक मारत होते. कृपाशंकर सिंह व जनार्दन चांदोरकर यांनीही कामत यांच्याच मार्गदर्शनाखाली काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न केला.

वाचा : ‘कामत यांच्या निधनाने कुशल संघटक गमावला’