Thu, Jul 18, 2019 17:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयापुढे आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने खळबळ

मंत्रालयापुढे आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने खळबळ

Published On: Mar 23 2018 8:30PM | Last Updated: Mar 23 2018 8:30PMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच शुक्रवारी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील गुलाब शिंगरे (वय 56) या व्यक्‍तीने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. 

गुलाब शिंगरे हे दुपारी मंत्रालयात प्रवेश करीत असताना पोलिसांनी त्यांना हटकले. त्यावेळी त्यांनी सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  मात्र, सुरक्षा व्यवस्थेवर तैनात पोलिसांनी त्यांना त्वरित ताब्यात घेतले. त्यानंतर या व्यक्‍तीला मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे चौकशी केली असता ते बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका खेड्यात राहणारे आहेत. त्यांची जमीन स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी हडप केल्यामुळे ते तक्रार देण्यासाठी मंत्रालयात आले असल्याचे समोर आले. 

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर मंत्रालयात आत्महत्येचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. अधिवेशनादरम्यान असे प्रकार घडू नयेत, म्हणून पोलिस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. मंत्रालय आणि विधानभवन परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला असून संशयित व्यक्‍ती आढळून आल्यास पोलिस चौकशी करीत आहेत. अधिवेशन अंतिम टप्प्यात असताना पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने पोलिसांना अधिक सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

Tags : mumbai, mumbai news, ministry, Gulab Shingare, suicide,