Sat, Mar 23, 2019 02:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुजराती सिंह येणार; मुंबईकर वाघाला चालेल का?

गुजराती सिंह येणार; मुंबईकर वाघाला चालेल का?

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 1:58AMमुंबई : राजेश सावंत

मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात वाघ-सिंहाची लढाई चांगलीच चर्चेत होती.  वर्तमान पत्र व बॅनरबाजीतून सुरू असलेल्या वाघ-सिंहाच्या या लढाईचा मुंबईकरांनीच नाही तर राज्यातील जनतेने मनमुराद आनंदही लुटला. आता तर राणीबागेतील प्राणी संग्रहालयात चक्क गुजराती सिंहच मुंबईत आणला जाणार आहे. त्यामुळे हा सिंह मुंबईकर वाघाला चालेल का ? अशी चर्चा पालिकेच्या स्थायी समितीत उपस्थित करून भाजपने शिवसेनेला  डिवचण्याचा प्रयत्न केला. 

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंहाची उपमा दिली जाते. त्यामुळे मुंबईत भाजपाने पुढाकार घेऊन भरवलेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमात सिंहाची प्रतिकृती तयार केली. एवढेच नाही तर, सिंहाच्या प्रतिकृती ठिकठिकाणी लावून जोरदार प्रचार केला होता. काही ठिकाणी बॅनरबाजी करून सिंह-वाघाची लढाई दाखवण्यात आली होती. या लढाईत वाघ घायाळ झालेलाही दाखवण्यात आला. याला प्रतिउत्तर म्हणून शिवसेनेने सामना मुखपत्रात एका जंगलातील फोटो प्रसिध्द करत, वाघाने सिंहाला घायाळ केल्याचे दाखवले होते. सिंह-वाघाची ही लढाई महापालिका निवडणुकीतही गाजली होती. आता तर मुंबई महापालिकेने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात (राणीबाग) थेट गुजरात येथून सिंह आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या वर्षभरात हा सिंह राणीबागेत दाखल होणार आहे. यासाठी गुजरात व महाराष्ट्रातील भाजपा सरकार पालिकेला मदत करत आहेत. 

दरम्यान गुजरात येथून सिंह येणार याची कल्पना असतानाही बुधवारी स्थायी समितीत भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी राणी बागेत सिंह कुठून येणार अशी विचारणा करून, थेट शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही समितीमधील शिवसेना नगरसेवकांकडे बघत, मुंबईकर वाघ.. सिंहाला स्वीकारणार का ? असे गमतीने विचारले. 

यावर शिवसेना काहीच बोलली नाही. पण समितीची बैठक संपल्यानंतर सभागृह नेते यशवंत जाधव यांना गुजराती सिंहांबद्दल पत्रकारांनी छेडले असता, मुंबईत कुठूनही सिंह आला तरी, येथे वाघच राज्य करणार, असे मार्मिक उत्तर दिले. त्यामुळे येणार्‍या विधानसभा व लोकसभा निवडणूकीत वाघ-सिंहाची लढाई पुन्हा मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. 

Tags : Mumbai, Mumbai news, Gujrishi Lion, coming, mumbai zoo, people, Taking politically,