Wed, Jul 17, 2019 12:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण : नववर्षाचे जल्लोषात स्वागत; अवतरले सामाजिक संदेशांचे रथ

कल्याण : नववर्षाचे जल्लोषात स्वागत; अवतरले सामाजिक संदेशांचे रथ

Published On: Mar 18 2018 6:18PM | Last Updated: Mar 18 2018 6:15PMडोंबिवली : वार्ताहर

हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत काढण्यात आलेल्या शोभा तथा स्वागत यात्रेत ढोल-ताशा पथकांचे शिस्तबद्ध वादन आणि लेझिमच्या तालावर फेर धरणारे शाळकरी विद्यार्थी यांचा जल्लोष पाहावयला मिळाला. यात्रेत सहभागी झालेल्या विविध संस्थांचे चित्ररथ सामाजिक संदेश देत होते. काही ठिकाणी यात्रेत सहभागी असलेल्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते. तर काही ठिकाणी पुष्पवृष्टी केली जात होती. हा स्वागत यात्रेचा डौल, जल्लोष आणि संदेश पाहण्यासाठी कल्याण-डोंबिवलीकरांनी एकच गर्दी केली होती.

शहराच्या पश्चिमेकडील कान्होजी जेधे तथा भागशाळा मैदान येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभापती राहूल दामले व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी गुढीचे पूजन केले. त्यानंतर पालखी पूजन करून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. पश्चीमेतील दीनदयाळ रोडवर भाजप नगरसेविका मनिषा व नगरसेवक शैलेश धात्रक दाम्पत्याने यात्रेवर पुष्पवृष्टीने स्वागत केले. नागरीकांची कर्तव्ये, सुंदर व स्वच्छ डोंबिवली अशी असल्याने गणेश मंदिर संस्थानने भारतीय राज्य घटनेची उद्देशीका व नागरीकांच्या कर्तव्ये असा भला मोठा फलक व चित्ररथच तयार केला होता. मन:शक्ती केंद्राच्यावतीने स्मार्ट पिढी चारित्र्य संपन्न व्हावी, असे आवाहन केले होते. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेच्यावतीने व्यसनमुक्तीचा संदेश दिला गेला. स. वा. जोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रीन इंडियाचा संदेश दिला. डोंबिवली सांस्कृतिक परिवाराच्यावतीने ई-बँकिंगचा वापर करा, असे आवाहन करण्यात आले. फीडींग इंडियाने अन्नाचा नाश करू नका, हा संदेश दिला. आई बंगल्याजवळ उर्जा फाऊंडेशनने प्लॅस्टीक मुक्तीचा संदेश देणारा देखावा केला होता. सायकल क्लबने फिट रहा, तर कोकण कुणबी रहिवासी संघटनेने मोबाईल वापराचा अतिरेक टाळा असे चित्ररथ तयार केले होते. ब्राह्मण महासंघ व खान्देश मराठा सेवा संघाच्यावतीने यात्रेत सहभागी झालेल्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जात होते. मराठावाडा विदर्भ रहिवासी संघाने पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती केली. डोंबिवलीची स्वागतयात्रा राज्यभर चर्चाचे विषय ठरत असतो. मात्र यंदा ही स्वागतयात्रा राजकीय पक्षांनी हायजॅक केल्याचे दिसून आले. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानापासून पूर्वेतल्या गणेश मंदिरापर्यंत ही स्वागतयात्रा जाते. मात्र या संपूर्ण रस्त्यावर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाच्यावतीने झेंडे व बॅनरबाजी करण्यात आली होती.
 
गावकऱ्यांनी दिला अध्यात्मिक संदेश 

श्रीक्षेत्र पिंपळेश्वर महादेव भक्तमंडळाच्यावतीने काढण्यात आलेल्या स्वागतयात्रेच्या माध्यमातून आध्यात्मिक संदेश देण्यात आला. या यात्रेत श्री गणेश मंडळ आणि शंखेश्वर नगर विद्यालय या दोन शाळेच्या लेझीम पथकाने सहभाग घेतला होता. अनंत संप्रदायाचे वारकरी दिंडीत सहभागी झाले होते. या स्वागतयात्रेत जवळपास 2 हजार ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. स्वागतयात्रेत आणि कीर्तनात सहभाग घेणाऱ्या नागरिकांसाठी मंदिरातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी दिली. तसेच मंदिरात हभप रमेश महाराज चाळीसगाव यांचे कीर्तन सादर क रण्यात आले. कीर्तनातून प्रबोधन करीत मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सोनारपाडा ते पिंपळेश्वर मंदिर आणि स्टार कॉलनी ते पिंपळेश्वर मंदिर अश्या दोन ठिकाणाच्या उपयात्रेचा समारोप श्रीक्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिरात करण्यात आला. 

Tags : GudhiPadwa 2018, marathi culture, marathi new year, girls, man, women, childrens, rally,