Fri, Mar 22, 2019 06:23
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खारफुटींची कत्तल करणार्‍यांवर होणार कारवाई

खारफुटींची कत्तल करणार्‍यांवर होणार कारवाई

Published On: Jan 11 2018 1:31AM | Last Updated: Jan 11 2018 12:55AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

खाडीत तसेच खारफुटींवर मोठ्या प्रमाणावर भर टाकून खाडी बुजवून बेकायदा बांधकामे करण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच बेकायदा रेती उपसाही वाढला असून या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी रेती माफिया व भू-माफियांवर एमपीडीए आणि मोक्कासारख्या कठोर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांना दिले.

ठाणे जिल्ह्यात खाडीकिनारी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे कांदळवणाची कत्तल करुन त्यावर भराव टकण्यात येत असल्याचा प्रश्‍न बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समीतीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. यावेळी आमदारांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला धारेवर धरत केवळ कळवा खाडी परिसर, कशेळी, कल्हारे आदी खाडी किनार्‍यांवरील कांदळवणांची कत्तल होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात आजही अवैधरित्या रेती उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असून निसर्गाचा र्‍हास होण्याची भिती व्यक्त होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला जाब विचारण्यात आला. 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी राज्यातील एमपीडीएची पहिली केस ठाणे जिल्ह्यात केल्याची माहिती दिली. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी व अवैध बांधकामे रोखण्यासाठी तातडीने तीव्र मोहीम हाती घेतली जाईल, असे सांगितले.

कांदळवाणाची कत्तल करून अनधिकृत बांधकामे उभारण्यात येत आहेत. रेती माफिया ज्या ठिकाणी रेतीचा उपसा करत आहेत त्याठिकाणी जिल्हा प्रशासनाने त्वरित कारवाई करावी तसेच मोक्का किंवा एमपीडीएसारखे कठोर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.