Mon, Apr 22, 2019 12:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खड्ड्यात पडून लोक मरताहेत,जबाबदारी कुणी घ्यायची ?

खड्ड्यात पडून लोक मरताहेत,जबाबदारी कुणी घ्यायची ?

Published On: Jul 15 2018 1:55AM | Last Updated: Jul 15 2018 1:50AMकल्याण/ डोंबिवली/ ठाणे : वार्ताहर/ प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यातील खड्डेबंबाळ रस्त्यांवर एकामागोमाग एक अपघातबळी जात असल्याने जनमानस कमालीचे संतप्त आहे. शनिवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे तसेच कल्याण-डोंबिवलीच्या खड्डेग्रस्त रस्त्यांना भेट देऊन अधिकार्‍यांना अक्षरशः धारेवर धरले. रस्ता कुणाचा या वादात पडू नका, खड्ड्यात पडून लोक मरताहेत, त्याची जबाबदारी आपण घेणार आहोत की नाही? असा संतप्त सवाल अधिकार्‍यांना करताना खड्डेग्रस्त रस्त्यांवर संबंधित अभियंत्याचे नाव, फोटो आणि फोन नंबर लावण्याची सूचनाही त्यांनी कल्याण-डोंबिवलीचे आयुक्‍त गोविंद बोडके यांना केली. 

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डे आणि राजकारण अशी सांगड मुंबईत घातली गेली असली तरी कल्याण-डोंबिवलीत परिस्थिती वेगळी आणि भीषण आहे. आठवडाभरात कल्याणच्या खड्ड्यांमध्ये पडून पाच जणांचा बळी गेला. खड्ड्यातील जीवघेणे अपघातांच्या मालिका सुरू असतानाही या दुर्घटनांची महापौर, नगरसेवक, आयुक्‍त, नगर अभियंते यापैकी कुणीही त्याची दखल घेतली नाही. राजकीय नेते राजकारणात आणि अधिकारी आपापल्या केबिनमध्ये बसून होते. रस्त्यातील खड्ड्यांविरोधात सुरुवातीपासून मनसे तेवढी आक्रमक होती. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही खड्ड्यात उतरून आंदोलने केली. मात्र त्यांचा सूर ना अधिकार्‍यांच्या कानी पडला ना कारभार्‍यांच्या. अखेर नागपूरला सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातून पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आले, तेच शनिवारी कल्याण-डोंबिवलीच्या खड्ड्यांमध्ये उतरले. प्रशासनाबरोबरच आपल्याच पक्षाच्या सत्ताधारी सदस्यांनाही त्यांनी या खड्ड्यांमध्ये गाठत  धारेवर धरले.

रस्त्यांच्या दुर्दशेबाबत संताप व्यक्त करत पालकमंत्री म्हणाले, रस्ते कोणाच्या ताब्यात आहेत यासारखी कारणे न देता कार्यालयात बसून काम न करता रस्त्यावर उतरा, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा... शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. कामात निष्काळजीपणा करणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करून शहर अभियंता प्रमोद कुलकर्णीला निलंबित करा, असे आदेशच त्यांनी  पालिका आयुक्तांना दिले. शिंदे यांनी मुंबई-नाशिक मार्गावरील माणकोली, राजनोळी नाका, तर कल्याण-भिवंडी रोडवरील गोवे नाका, कोनगाव, कल्याणातील शिवाजी चौक, रामबाग परिसरात खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णीसह अधिकार्‍यांच्या लवाजमा सोबत होते. अपघात झालेल्या शिवाजी चौक व कोनगाव येथील खड्ड्यांचीही  त्यांनी पाहणी केली.