होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिला उद्योजकांना मिळणार कर्जाच्या व्याजावर अनुदान

महिला उद्योजकांना मिळणार कर्जाच्या व्याजावर अनुदान

Published On: May 18 2018 1:43AM | Last Updated: May 18 2018 1:23AMमुंबई :प्रतिनिधी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या महिला उद्योग धोरणाच्या अनुषंगाने त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार वीज दरात 1 रुपये व 2 रुपये अशी युनिटमागे सवलत देण्यात येणार आहे. तर कर्जाच्या व्याजावर तसेच भांडवली अनुदानही देण्यात येणार आहे. 

या धोरणानुसार महिला  उद्योजकांची व्याख्या करण्यात आली आहे. 25 लाख रुपयांपर्यत सूक्ष्म, 25 लाख ते 5 कोटी रुपये लघु व 5 कोटी ते 10 कोटी रुपये मध्यम अशी त्याची व्याख्या निश्‍चित करण्यात आली आहे. विशेष प्रोत्साहन योजनेखाली या सवलती देण्यात येणार आहेत. 

भांडवली अनुदान हे तालुक्याच्या वर्गीकरणानुसार देण्यात येणार आहे. हे अनुदान उत्पादन सुरू  झाल्यापासुन पुढे 5 वर्षापर्यंत समान हत्प्याने दिले जाणार  आहे. अ, ब  व क दर्जाच्या तालुक्यात 15 टक्के , ड वर्ग तालुक्यात 20 टक्के ड प्लस वर्गात 25 टक्के तर नक्षल प्रभावित भाग व  उद्योग नसलेल्या तालुक्यात ते 35 टक्के एवढे दिले जाणार  आहे. हे प्रमाण स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या प्रमाणात दिले जाणार आहे.तर विशेष भांडवली अनुदान हे अ , ब व क  वर्ग तालुक्यांसाठी 20 टक्के,ड  वर्गासाठी  25 टक्के,  ड प्लस वर्गासाठी 50 टक्के तर उद्योग नसलेले जिल्हे व नक्षल प्रभावित विभागात ते 100 टक्के दिले जाणार आहे.