Wed, Apr 24, 2019 11:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नातवानेच केली आजोबांची हत्या 

नातवानेच केली आजोबांची हत्या 

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 07 2018 12:55AMमुंबई : प्रतिनिधी

दक्षिण मुंबईतील गोवा स्ट्रीट परिसरात राहात असलेल्या अजा तेजलींग लामा या 75 वर्षीय वयोवृद्धाच्या हत्येचे गुढ उकलण्यात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना यश आले आहे. मालमत्ता हडप करण्यासाठी नातवानेच मारेकरी पाठवून हे हत्याकांड घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून पोलिसांनी याप्रकरणी नातवासह पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

मूळचे दार्जिलींगमधील रहिवाशी असलेले लामा हे गोवा स्ट्रीट परिसरातील संत निवास इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील दहा बाय दहाच्या खोलीमध्ये एकटे राहात होते. त्यांच्या मुलाचे आणि मुलीचे निधन झाले असून सूनेसह अन्य कुटुंबीय डोंबिवलीमध्ये वास्तव्यास आहेत. लामा राहात असलेल्या फोर्टमधील खोलीसह याच परिसरात तीन छोटी दुकाने, डोंबिवलीमध्ये फ्लॅट आणि दुकान गाळे, तसेच कांदिवलीमध्ये फ्लॅट अशी मालमत्ता आहे. फोर्टमधील छोट्या दुकानांचे दर दिवसाचे सुमारे दिड हजार रुपये भाडे येत होते. यातील एका दुकानाचे भाडे ते सुनेला कुटूंब चालविण्यासाठी देत, तर उरलेल्या दोन दुकानांच्या भाड्यावर ते आपला उदरनिर्वाह चालवत होते. 

आजोबांची हीच मालमत्ता हडपण्यासाठी नातवाने सुपारी दिली. विशेष म्हणजे नातवाने आजोबांची हत्या होण्यापूर्वी या मारेकर्‍यांची गाठ आजोबांशी घालून दिली होती.  नेहमीप्रमाणे लामा हे घरी परतल्यानंतर पहिल्या मजल्यावरील मोकळ्या जागेत त्यांना सुपारीबाजांनी अडवले व यातील एकाने त्यांचे तोंड दाबले. तर दुसर्‍याने चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. लामा हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळताच दोघांनीही तेथून पळ काढला. इमारतीमध्ये दुकानगाळे अधिक असल्याने रात्री कोणीच येथे फिरकले नाही. त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना समोर आली. तोपर्यंत मारेकरीसुद्धा पसार झाले होते. तसेच इमारतीसह आजूबाजूच्या परिसरात सीसीटिव्ही फुटेज नसल्याने आणि स्वत: डोंबिवलीतील घरी असल्याने पोलीस आपल्याला पकडून शकणार नाहीत अशा आर्विभावात दोरजी वावरत होता. मात्र त्याचा हा भ्रम अधिक काळ टिकला नाही.

लामा यांच्या हत्येप्रकरणी अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास करत असलेल्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय कांबळे यांच्या नेतृत्वातील पथकाने माग काढत गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या दोरजीला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत असलेल्या दोरजीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर अन्य आरोपींनाही डोंबिवली परिसरातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

लामा यांची मालमत्ता आपल्याला मिळावी म्हणून डोंबिवलीतील नवापाडा परिसरात राहात असलेला त्यांचा नातू दोरजी टेनसींग सामा (29) याने त्याचे साथीदार उत्कर्ष उर्फ कृष्णा महेंद्र सोनी (19), अंजेल डॉनियल भिसे (22), जयेश उर्फ फ्रॅन्डी कनोजीया (19) आणि आनंद दिलीप राय (21) यांच्या मदतीने नारळी पौर्णिमेदिवशी लामा यांच्या हत्येचा कट आखला. ठरल्याप्रमाणे सामा याने हत्येआधी कटात सामील असलेल्या साथिदारांची व लामा यांची भेट घालून दिली होती. कटानुसार बुधवारी रात्री लामा घरी परतण्याआधीच सोनी आणि कनोजीया हे दोघेही इमारतीमध्ये दबा धरुन बसले होते. तर भिसे आणि राय हे इमारतीखाली पहारा देत उभे होते.