Fri, Apr 26, 2019 01:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पदवीधर निवडणुकीचा बिगुल वाजला!

पदवीधर निवडणुकीचा बिगुल वाजला!

Published On: Feb 23 2018 1:42AM | Last Updated: Feb 23 2018 1:35AMमुंबई : प्रतिनिधी

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीची तारीख विद्यापीठाने जाहीर केली आहे. प्राध्यापक सदस्यांच्या निवडीनंतर आता पदवीधरच्या सदस्य निवडीची निवडणूक 25 मार्चला होणार आहेत. यासंदर्भातील संपूर्ण निवडणूक कार्यक्रम येत्या 27 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. अधिसभा निवडणुकीमध्ये विद्यापीठातून पदवीधर झालेल्या युवकांना अधिसभेत जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. हा अधिकार प्राप्त होण्यासाठी विद्यार्थी संघटनांनाची गेल्या दोन वर्षापासूनच तयारी सुरु आहे.  

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या पदवीधरांना नोंदणी करणे, त्यांचे अर्ज सादर करणे अशा कामे केली होती. विद्यार्थी संघटनांनी पदवीधर नोंदणी केली आहे. याच पदवीधरांच्या मतदानातून पदवीधर कोट्यातून अधिसभेवर दहा सदस्य निवडून जाणार आहे.मुंबई विद्यापीठात युवासेनेचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणूकीत आठ जागा युवा सेनेला तर दोन जागा मनविसेने पटकावल्या होत्या. यंदाही या निवडणूकीसाठी युवासेनेने मोठी तयारी केली आहे. त्यापाठोपाठ आता मनविसे, अभाविप, राष्ट्रवादी, छात्रभारती अशा संघटनांनी कंबर कसली आहे. दोन ते अडीच वर्षांनंतर मुदत संपूनही ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने पदवीधर निवडणूक ही अधिसभेत महत्त्वाची आहे. त्यामुळे येत्या मार्चमध्ये निवडणूकीची रणधुमाळी उडणार आहे.

परीक्षा हंगाम त्यातच या निवडणूका त्यामुळे ही निवडणूक विद्यार्थी संघटनांची अटीतटीची होणार आहे. तब्बल 62 हजार 559 पदवीधर मतदार या निवडणूकीसाठी आहेत. विद्यापीठाने यापूर्वी 58314 मतदारांची यादी जाहीर केली होती. त्यात हरकती व बदलांच्या सूचना आल्यानंतर आता 62 हजार 559 इतक्या मतदारांची यादी अंतिम करण्यात आली आहे. ही यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळार उपलब्ध करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात प्राध्यापक अधिसभा सदस्य पदाच्या निवडणूकीची तारीख 16 मार्च अशी जाहीर केली आहे. ही निवडणूकीही 10 जागांसाठी होईल. तर पहिल्या टप्प्यात कॉलेज प्राचार्य, कॉलेज मॅनेजमेंट आणि विद्यापीठ अध्यापक प्रवर्गाचा टप्पा पार पडला. मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेली कॉलेज प्राध्यापक आणि पदवीधर मतदार संघाची ही निवडणूक असल्याने आता प्राध्यापक आणि विद्यार्थी संघटनांची मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. उमेदवार निश्‍चिती आणि मतदार भेटीची पहिल्या फेरीला आता लवकरच सुरुवात होणार आहे.