होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोविंदांचे विमाकवच झाले स्वस्त!

गोविंदांचे विमाकवच झाले स्वस्त!

Published On: Aug 05 2018 1:43AM | Last Updated: Aug 05 2018 12:58AMठाणे : अनुपमा गुंडे

विमा उतरविलेल्या दिवसापासून ते दहीहंडीच्या दुसर्‍या दिवसापर्यंत जखमी झाल्यास किंवा अपघाती मृत्यू झाल्यास गोविंदांना दरवर्षीप्रमाणे विम्याचे संरक्षण यंदाही मिळणार आहेच, परंतु विम्याची रक्कम सर्व लहान पथकांच्याही आवाक्यात यावी यासाठी यंदाच्या वर्षापासून विम्याची रक्कम 100 रुपयांवरून 75 रुपये करण्याचा निर्णय ओरियंटल इन्शुरन्स कंपनीने घेतला आहे. शिवसेना खासदार आणि दहीहंडी समन्वय समितीच्या पाठपुराव्यामुळे हे विमाकवच स्वस्त झाले आहे. 

दहीहंडीच्या साहसी उत्साहात दरवर्षी अनेक गोविंदा जायबंदी होतात. गेल्या काही वर्षांत थरांच्या चित्तथरारक स्पर्धांमुळे हे साहस गोविंदांच्या जीवावरही बेतले आहे. या उत्सवाच्या काळात गोविंदांना होणारी दुखापत लक्षात घेऊन गेल्या 11 वर्षांपासून गोविंदा पथके स्वतः, तर काही ठिकाणी आयोजक गोविंदांचा विमा उतरवित आहेत. गेल्यावर्षापर्यंत पथकातील प्रत्येक गोविंदाच्या विम्याची रक्कम 100 रुपये याप्रमाणे आकारली जात होती; परंतु लहान गोविंदा पथकांना ही विम्याची रक्कम परवडत नव्हती.

विशेषतः मुंबई, ठाणे वगळता अन्य भागांतील गोविंदांना दहीहंडीच्या काळात मोठ्या संख्येने बक्षिसे मिळतातच असे नाही, किंवा प्रायोजकत्व मिळतेच असे नाही, त्यामुळे विमा उतरविणे त्यांना परवडत नाही, ही बाब लक्षात घेऊन दहीहंडी समन्वय समिती आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी या प्रकरणी ओरियंटल इन्शुरन्स कंपनीने विम्याची रक्कम कमी करावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. विमा कंपनीने विम्याची रक्कम कमी केल्याने गोविंदा पथकांना त्याच लाभ होईल, जास्तीत जास्त मंडळे आणि गोविंदांना हे सुरक्षा कवच या निर्णयामुळे मिळणार आहे,  अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र दहीहंडी समन्वय समितीचे  सचिव समीर पेंढारे यांनी  दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केली. 

गोविंदांचा विमा गेली 11 वर्षे ओरियंटल इन्शुरन्स कंपनीच उतरवत आहे. विम्याची रक्कम सर्वसाधारण, लहान गोविंदा पथकांना परवडत नाही, दहीहंडी समन्वय समिती व शिवसेना खासदारांनी विम्याची रक्कम कमी करण्याची मागणी केली होती. मुंबई-ठाणे वगळता अन्य ठिकाणच्या गोविंदा पथकांना फारसे उत्पन्न नसते, त्यामुळे कंपनीला या पथकांना विम्याच्या रकमेत सुवर्णमध्य साधायचा होता. आता बर्‍याचअंशी सुरक्षित दहीहंडी साजरी केली जाते. फक्त काही अपघात घडल्यास गोविंदा पथकांचे बजेट कोलमडते. त्यांना आर्थिक पाठबळ म्हणून विम्याची रक्कम कमी करण्यात आली.

जीएसटी धरून विम्याची रक्कम 75 करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेपासून विमा उतरविण्यास प्रारंभ झाला आहे. आता जागृती झाल्यामुळे जास्तीत जास्त गोविंदा पथके विमा उतरवित आहेत. विमा उतरवल्यापासून ते दहीहंडी संपल्यावर दुसर्‍या दिवशी (4 सप्टेंबर सकाळी 6 वाजेर्यंत) हा विमा गोविंदांना लागू राहील. असे ओरियंटल इन्शुरन्स कंपनीचे सहाय्यक प्रबंधक, सचिन खानविलकर यांनी सांगितले.