Fri, Jul 19, 2019 22:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य सरकारचे काऊंटडाऊन सुरू!

राज्य सरकारचे काऊंटडाऊन सुरू!

Published On: Feb 26 2018 1:44AM | Last Updated: Feb 26 2018 1:35AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

सरकारने  शेतकर्‍यांना जाहीर केलेली कर्जमाफी योजना जाचक अटींमुळे फसवी ठरली आहे. कर्जमाफीनंतरही दोन हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दिशाभूल करणार्‍या जाहिराती, ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि मॅग्‍नेटिक महाराष्ट्रातून बेरोजगारांची फसवणूक आणि अनेक मोदींच्या कारनाम्यांमुळे राज्यातील उद्योजक, शेतकरी, व्यापारी आणि जनतेेमध्ये ‘नीरव’ शांतता निर्माण झाली असल्याचा टोला विरोधकांनी लगावला आहे. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या फसव्या सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचा दावा करत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावरही बहिष्कार टाकला.

सोमवारपासून सुरू होणार्‍या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर विविध आरोप केले. राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनता, बेरोजगार आणि कामगारांच्या विरोधात हे सरकार धोरणे राबवित असल्याचा आरोप विरोधकांनी केला. 

विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ऑनलाईन पीकविम्याच्या सक्‍तीमुळे असंख्य शेतकरी पीकविम्यापासून वंचित असताना सरकार जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. प्रत्येकवेळी चुकीची कर्जमाफीची आकडेवारी जाहीर करून सरकार शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहे.

केंद्र सरकारने बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत न करण्याचे ठरविले आहे. तरीही राज्य सरकारने 22 डिसेंबरला मदत जाहीर केली आहे; पण अद्याप एक छदामही त्यांच्या बँक खात्यात जमा झाला नाही. केंद्राकडून बोंडअळीग्रस्तांना मदत दिली जाणार नाही. राज्य सरकारने याची खात्री एकनाथ खडसे यांच्याकडूनही करावी, असा खोचक सल्लाही खडसे यांनी सरकारला दिला.

‘मेक इन महाराष्ट्र’ आणि मॅग्‍नेटिक महाराष्ट्रसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून सरकारने रोजगार निर्मितीचा दावा केला असतानाही महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात बेरोजगारांचे आंदोलन होत आहे, मोर्चे निघत आहेत. सरकारच्या या धोरणांमुळे महाराष्ट्र फ्रस्ट्रेट झाला आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि मॅग्‍नेटिक महाराष्ट्र’बाबत सरकारने श्‍वेतपत्रिका काढावी.
कमला मिल आगीत चौदा जणांचा बळी गेला असताना शिवसेनेच्या एका नेत्याला आणि मुंबई महानगरपालिका आयुक्‍तांना चौकशीपासून वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भाजपचे मंत्री जमिनीचे गैरव्यवहार आणि मंत्रिपदाआडून मलई खाण्यात गुंतलेत. तर शिवसेना फक्‍त सत्ता सोडण्याचे विक्रमी इशारे देत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. विधानसभा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह आमदार विजय वडेट्टीवार, शरद रणपिसे, संजय दत्त आणि राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक आदी यावेळी उपस्थित होते.