रस्त्यावर दिसल्यास ‘सरकारी’ क्वारंटाईन

Last Updated: Mar 30 2020 1:36AM
Responsive image


मुंबई : पुढारी डेस्क

कोरोनामुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन करून कोणी शहरात आणि महामार्गांवर फिरत असेल, तर त्याला पकडून सरळ 14 दिवसांच्या ‘सरकारी  क्वारंटाईन’मध्ये पाठवा, असे कठोर निर्देश केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. स्थलांतर रोखण्यासाठी सर्व राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्याही सीमा तत्काळ बंद करा, असेही केंद्राने सांगितले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर देशात जारी झालेल्या लॉकडाऊनमुळे हजारो मजूर गावी परतू लागले असून, कोरोनाच्या महासंकटात विशेषतः परप्रांतीयांचे स्थलांतर हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून  कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राने राज्यांना वरील आदेश दिले.

केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने विशेष निवेदन जारी करत स्पष्ट केले की, लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर येणार्‍याला किमान 14 दिवसांचे क्वारंटाईन आणि तेही घरी नव्हे, शासकीय क्वारंटाईन सुविधा असलेल्या दवाखान्यात सक्तीचे करण्यात आले आहे. क्वारंटाईन काळात अशा लोकांवर खास नजर ठेवण्याच्या सूचनाही राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.

...तर जिल्हाधिकारी, पोलिसप्रमुख जबाबदार

कॅबिनेट सचिव राजीव गौबा आणि केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी रविवारी सर्व राज्यांच्या मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. 
रस्त्यावरून केवळ जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणार्‍या गाड्या आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच प्रवास करू शकतील, बाकी कुणालाही असा प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. 
एका शहरातून दुसर्‍या शहरात जाणारे लोंढे रोखण्याची जबाबदारी त्या त्या जिल्हाधिकारी आणि पोलिसप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. लोंढे रोखले न गेल्यास त्यांना जबाबदार धरले जाईल. घराबाहेर पडून गावी चाललेल्या लोकांना जवळच्या ठिकाणी निवारा आणि जेवणाची सोय करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

गेल्या तीन दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. हाताला काम नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे गावी जाऊन दिवस काढण्याच्या हेतूने हे मजूर मोठ्या प्रमाणात शहराबाहेर पडले आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हे लोक बाहेर पडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मजुरांना घरभाडे

शहरातील घरभाडे आणि खाण्या-पिण्याचा खर्च परवडत नाही म्हणून परप्रांतीयांचे लोंढे शहरे सोडून गावाकडे जात आहेत. यावर देशभर चर्चा सुरू झाल्यामुळे या परप्रांतीयांच्या प्रचंड स्थलांतरांची नोंद घेत, या परप्रांतीय मजुरांचे घरभाडे देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत. अशा मजुरांना किंवा विद्यार्थ्यांनाही घर सोडून जाण्यास सांगणार्‍या घरमालकांवर कारवाई करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्याने मजुरांना विनाविलंब मजुरी मिळेल, त्यात कोणतीही कपात होणार नाही. याची खबरदारी घेण्याची सूचनाही राज्यांना करण्यात आली आहे.articleId: "185572", img: "Article image URL", tags: "mumbai, mumbai news, seen street, Government quarantine, मुंबई, सरकारी क्वारंटाईन,",