Mon, Mar 25, 2019 13:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारी कर्मचार्‍यांच्या बदल्या आता पारदर्शक

सरकारी कर्मचार्‍यांच्या बदल्या आता पारदर्शक

Published On: Apr 26 2018 2:00AM | Last Updated: Apr 25 2018 8:16PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

सरकारी कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये होणार्‍या गैरकारभाराची दखल घेत राज्य सरकारने आता वर्ग ब, क आणि ड मधील कर्मचार्‍यांच्या बदल्या पारदर्शकपणे करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलीसाठी इच्छुक असलेल्या कर्मचार्‍यांसमक्ष बदलीचे ठिकाण जाहीर करण्यात येईल. जो कर्मचारी इच्छुक असेल, तेथे त्याची ज्येष्ठतेनुसार बदली केली जाईल. हा आदेश वैद्यकीय अधिकार्‍यांनाही लागू करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सामान्य प्रशासन विभागाला केली आहे.

राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या दर दोन ते तीन वर्षांनी नियमानुसार बदल्या होतात. यातील काही बदल्या प्रशासकीय, तर काही बदल्या विनंतीवरून कराव्या लागतात. एका बदलीच्या ठिकाणी अनेक जण इच्छुक असल्यामुळे आपली बदली कुठे होणार, याची चिंता प्रत्येकाला लागलेली असते. एप्रिल आणि मेमध्ये अनेक जण बदल्यांसाठी आमदारांच्या कार्यालयांपासून थेट मंत्रालयापर्यंत खेटे मारतात.

बदलीस विलंब होत असल्याचे पाहून काही जण एजंटला हाताशी धरतात. यामध्ये नाहक संबंधित विभागाचे मंत्री किंवा अधिकारी बदनाम होतात. त्यामुळे चिरीमिरीला चाप लावण्यासाठी यापुढे वर्ग-1 आणि 2 वगळता उर्वरित सर्व कर्मचार्‍यांच्या बदल्या समुपदेशनाने करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. यामुळे मंत्री आणि आमदारांची बदल्यांसाठी होत असलेली डोकेदुखी थांबण्याची शक्यता आहे.

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये मंत्र्यांच्या दालनात येणार्‍या पत्रांपैकी ऐंशी टक्के पत्रे ही केवळ बदलीच्या शिफारशींची असतात. त्यामुळे मंत्री त्रस्त होऊन जातात. त्यामुळे समुपदेशन करूनच बदल्या करण्यास सर्वच मंत्र्यांनीही पसंती दिल्याचे समजते.

बदल्या प्रस्तावित असलेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या परिमंडळात बोलावून बदल्यासाठी कुठे जागा रिक्‍त आहेत, याची माहिती दिली जाईल. जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना, तर जिल्ह्याबाहेरील बदल्या या समुपदेशनामार्फत केल्या जातील. सध्या अ आणि त्यावरील श्रेणीतील बदल्यांचे अधिकार हे वरिष्ठ पातळीवरच ठेवण्यात आले आहेत.

Tags : mumbai, mumbai news, Government employees, transfer, transparent now,