Thu, Apr 18, 2019 16:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संपावरून रावते-तावडे जुंपली

संपावरून रावते-तावडे जुंपली

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 1:50AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

सरकारी कर्मचारी संपावरुन मंत्रिमंडळात परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. राज्यात मराठा आरक्षण पेटले असताना सरकारी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपावर नाराजी व्यक्त करीत रावते यांनी संपकरी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, विनोद तावडे यांनी राजकारणात असे करुन चालत नसल्याचे सांगत त्यांना विरोध केल्याने संतप्त झालेल्या रावतेेंनी बैठकीतून बहिर्गमन केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढून बोलवून घेतल्यानंतर रावते बैठकीत परतले. 

राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांनी मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचार्‍यांच्या संपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली. त्यावर दिवाकर रावते यांनी संपाबद्दल नाराजी व्यक्त केली. राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. धनगर आणि मुस्लिम समाजही आंदोलनाच्या तयारीत आहे. अशावेळी त्यांच्या मागण्या योग्य असल्यातरी संपाची वेळ चुकीची आहे. त्यामुळे अशा कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी रावते यांनी केली. त्यावर तावडे यांनी त्यांना विरोध करीत राजकारणात अशी कारवाई करता येत नाही. असे सांगितले. त्यावर आपण राज्याच्या हिताचे बोलत असताना तावडे या संपाकडे राजकारणाच्या हेतूने पहात आहेत. राज्य पेटले असताना तुम्हाला निवडणुकांचे पडले आहे का? असा संताप व्यक्त करीत रावतेेंनी बैठकीवर बहिष्कार टाकला. 

रावते यांनी मंत्रालय पत्रकार कक्षात आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली. ते म्हणाले, कर्मचार्‍यांच्या मागण्यांना आपला अजिबात विरोध नाही. तसेच कर्मचार्‍यांवर मेस्मासारखी कारवाई करण्यास आपला विरोधच आहे. एस. टी. कामगारांनी मध्यंतरी पुकारलेल्या बंदमध्येही आपण मेस्मा लावला नव्हता. मागण्या योग्य पण संपाची वेळ चुकीची आहे, असे माझे म्हणणे होते. मात्र, भाजपच्या एका मंत्र्याने बाहेर चुकीची माहिती पेरली. मंत्रिमंडळ बैठक चालु असतानाच ही माहिती बाहेर कशीकाय आली? असा सवाल रावते यांनी केला.