Mon, Nov 19, 2018 04:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटीच्या डिझेलसाठी अनुदान देण्याचा सरकारचा विचार 

एसटीच्या डिझेलसाठी अनुदान देण्याचा सरकारचा विचार 

Published On: Jun 05 2018 1:37AM | Last Updated: Jun 05 2018 1:16AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

इंधन दरवाढीमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळावर वाढत असलेला अर्थिक ताण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. इंधन दरवाढ झाली म्हणून एसटीची भाडेवाढ करण्याची गरज नाही. याउलट बसेससाठी लागणार्‍या डिझेलवर अनुदान देता येईल का, याचा विचार आम्ही करत आहोत. याबाबत वाहतूक मंत्रालयास राज्याच्या अर्थमंत्रालयाचा पूर्णत: पाठिंबा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

नुकतेच 28 मे रोजी राज्याचे वाहतूक मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एसटी बसेससाठी लागणार्‍या इंधनावरील कर माफ करण्यात यावा, अशी मागणी केली होती. इंधन दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळावर 400 कोटींचा बोजा पडेल, असाही अंदाज त्यांनी वर्तवला होता. महामंडळाचा संचीत तोटा 2300 कोटींकडे चालला असल्याचे महामंडळाच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

प्रवासीवर्गाचा विचार करून गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने इंधन दरवाढ होत असतानाही महामंडळाने भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये अनेक जण आपल्या गावी जात असतात. यावेळी प्रवासासाठी अनेक जण एसटीचाच वापर करतात. यामुळे आपल्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भाडेवाढ करण्यात आली नाही. मात्र गेल्या आठवड्यात रावते यांनी एसटीच्या 30 टक्के भाडेवाढीची शिफारस केली आहे. 

इंधन दरवाढ व गेल्या शुक्रवारी करण्यात आलेली एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीची घोषणा यामुळे भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. सुमारे एक लाख कर्मचार्‍यांना वेतनवाढ दिल्याने महामंडळावर 4 वर्षांसाठी 4849 कोटींचा बोजा वाढणार आहे. यामुळे महामंडळाच्या वार्षिक तोट्यात 176 कोटींची वाढ होणार आहे. 

प्रस्तावानुसार एसटी कर्मचार्‍यांना 20 ते 32 टक्के इतकी वेतनवाढ दिली जाणार आहे. तसेच कमी वेतनश्रेणी असलेल्यांना 16 ते 48 टक्के इतकी वाढ दिली जाणार आहे.