Sat, Jul 20, 2019 15:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिकांच्या भ्रष्टाचारावर सरकारी लगाम

पालिकांच्या भ्रष्टाचारावर सरकारी लगाम

Published On: Dec 18 2017 2:38AM | Last Updated: Dec 18 2017 12:23AM

बुकमार्क करा

मुंबई : चंद्रशेखर माताडे

राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांतून बांधकामे व सजावटीच्या नावाखाली होणार्‍या भ्रष्टाचारावर फडणवीस सरकारने लगाम कसला आहे. प्रत्येक ठिकाणचे बांधकामाचे व फर्निचरचे वेगवेगळे दर व त्यातून होणार्‍या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी  सरकारने आता बांधकाम व फर्निचरचे कमाल दर निश्‍चित केले आहेत.

महापालिकेसह राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जातात. त्यामध्ये बांधकामावरच सर्वाधिक खर्च होतो. तर अधिकारी व पदाधिकारी बदलानंतर त्यांची दालने सजविण्यासाठी फर्निचरवर होणारा खर्च मोठा असतो. कंत्राटदारांना हातााशी धरून यातून भ्रष्टाचाराची साखळी पोसली जाते. टेंडरला बगल कशी द्यायची, ई-टेंडरिंग असले तरी त्याला बगल कशी द्यायची, याचे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे अड्डेच बनले आहेत. थोड्याफार फरकाने राज्यात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. 

यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा विषय राज्य सरकारसमोर होता. मात्र, प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या भौगोलिक स्थितीतून मार्ग काढण्याचे आव्हानही सरकारसमोर होते. त्यातूनच सरकारने बांधकामांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयांच्या स्तरावर दर निश्‍चित केले आहेत. तर फर्निचरसाठी राज्यात एकच दर लागू करण्यात आले आहेत.

याबाबतचा निर्णय घेताना सरकारने बांधकाम व फर्निचर करताना जी अंदाजपत्रके तयार करण्यात येत आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती दिसून आली आहे. यामुळेच बांधकामे व फर्निचरवर होत असलेला खर्च हा अनाठायी होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सरकारने  पैशाचा अपव्यय रोखण्यासाठी व त्यातून होणार्‍या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार राज्यात फर्निचर तयार करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना दोन ते तीन हजार रुपये चौरस  मीटर हा एकच दर निश्‍चित करण्यातआला आहे.  

बांधकामासाठी  विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रानुसार निश्‍चित करण्यात आलेले बांधकामाचे कमाल दर

मुंबई, कोकण विभाग : 25 हजार ते 28 हजार 500 रुपये, 
पुणे : 22 हजार ते 25 हजार रुपये, 
नाशिक : 22 हजार ते 25 हजार रुपये, 
औरंगाबाद : 20 हजार ते 22 हजार रुपये, 
नागपूर : 20 हजार ते 24 हजार रुपये
अमरावती 17 हजार ते 20 हजार रुपये.