Sat, Mar 23, 2019 18:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारी नोकर भरतीची जोरदार अफवा

सरकारी नोकर भरतीची जोरदार अफवा

Published On: Feb 04 2018 2:14AM | Last Updated: Feb 04 2018 2:13AMमुंबई : प्रतिनिधी

सामान्य प्रशासन विभागात लिपिक, रोखपाल, शिपाई, वाहनचालक अशा विविध 228 पदांसाठी भरण्यात येत असल्याची जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र फिरत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पदभरतीबाबत फिरत असलेली माहिती ही निव्वळ अफवा असून अशा बोगस जाहिरातीपासून सावध राहून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षाता घ्यावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाने केले आहे. 

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: अपमु-2917/प्रक.44/19-अ असा संदर्भ देऊन  विविध  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पदभरतीसंदर्भातील जाहिरात फिरत आहे. यामध्ये लिपिक-34, सहायक रोखपाल-22, रोखपाल-10, लेखापाल-6, गोपनीय लिपिक-19, देयक लेखापाल-14, शिपाई-58, वाहनचालक-34, नाईक-31 या पदांचा समावेश आहे.  या बोगस शासन निर्णयावर 10 जानेवारी तारीख असून अध्यक्ष निवड समिती तथा उपसचिव नगरविकास विभाग, मंत्रालय अशी स्वाक्षरीही आहे. यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तसेच शासकीय कर्मचार्‍यांकडून सातत्याने विचारणा होत असल्याने अशी कोणतीही भरती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असलेल्या जाहिरातीत देण्यात आलेली बहुतांश पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात. यासंदर्भात शासनाच्या कोणत्याही विभागाकडून जाहिरात देण्यात येत नाही. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सामान्य प्रशासन विभाग व त्या विभागांतर्गत अन्य पाच कार्यालयांच्या आस्थापनेवरील 195 अस्थायी पदांना 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.