Mon, Mar 25, 2019 13:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'अश्विनी बिंद्रे प्रकरणाचा तपास जलदगतीने होईल'

'अश्विनी बिंद्रे प्रकरणाचा तपास जलदगतीने होईल'

Published On: Mar 23 2018 7:19PM | Last Updated: Mar 23 2018 7:45PMमुंबई : प्रतिनिधी

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या खुनाच्या संदर्भात आरोपी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर व अन्य साथीदारांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक कुरुंदकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याबाबतच्या तरतूदी पाहून त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, कुरुंदकर यांना देण्यात आलेले पोलीस पदक परत घेण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.

अश्विनी बिंद्रे यांच्या खुनाच्या तपासाबाबत झालेली दिरंगाई व संबंधित आरोपींवर करण्यात येत असलेली कारवाई याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य हेमंत टकले व अन्य सदस्यांनी उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना डॉ.पाटील बोलत होते.

डॉ.पाटील म्हणाले, या प्रकरणात संबंधित आरोपींचे सीडीआर गोळा केले. घटना घडली त्या कालावधीत ते कोठे होते, याबाबतच्या स्थळांची माहिती प्राप्त करुन त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात ३८ प्रकारचे साहित्य जमा करण्यात आले आहे. हार्डडिस्क हस्तगत केली आहे. सर्व बाबींचा तपास सुरु असून या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. जलद गतीने कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच अश्विनी बिंद्रे यांच्या मृतदेहाचा शोध नौसेनेच्या मदतीने घेण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत टकले, गिरीष व्यास, चंद्रकांत रघुवंशी, विक्रम काळे, श्रीमती हुस्नबानु खलिफे यांनी सहभाग घेतला.