मुंबई : प्रतिनिधी
विदर्भातील गोसीखुर्द जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी आणि बांधकाम व्यावसायिक जीगर प्रवीण ठक्कर (41) याने मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मरीन ड्राईव्ह येथे पार्क केलेल्या गाडीमध्ये गोळी झाडून घेत आत्महत्या केली. जीगरच्या आत्महत्येने बांधकाम व्यावसायिकांत एकच खळबळ उडाली असून घटनेची नोंद करत मरीन ड्राईव्ह पोलीस तपास करत आहेत.
गोसीखुर्दच्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील शाखा कालव्याच्या शेवटच्या भागाचे मातीकाम आणि बांधकाम याचे कंत्राट मुंबईतील आर. जे. शहा अॅण्ड कंपनी आणि डी.ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीला देण्यात आले होते. तब्बल 56 कोटी रुपये किंमतीच्या निविदा प्रक्रियेमध्ये दोन्ही कंपन्यांनी अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन हे कंत्राट मिळवल्याचेएसीबीने केलेल्या तपासात उघड झाले. अखेर एसीबीने तत्कालीन अधिकार्यांसह संचालक कालिंदी शाह, तेजस्विनी शाह, त्यांच्या भागीदार कंपनीचे संचालक विशाल ठक्कर, प्रवीण ठक्कर, जीगर ठक्कर, अरुणकुमार गुप्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
घोटाळ्याच्या तपासाअंती एसीबीने बारा आरोपींविरोधात जानेवारी महिन्यात तब्बल 4 हजार 457 पानांचे आरोपपत्रही दाखल केले. घोटाळ्याची सुनावणी सुरू असतानाच घाटकोपरमध्ये कुटूंबासोबत राहात असलेला जीगर मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मरिन ड्राईव्ह येथे पोहोचला. त्याने चालक सुनील सिंग याला एनसीपीए समोरील एन. एस. रोडच्याकडेला कार पार्क करण्यास सांगितले.
सिंग याने कार पार्क करताच फोनवर बोलायचे आहे असे सांगून जिगरने त्याला कारच्या बाहेर जाण्यास सांगितले. सिंग हा कारपासून काही अंतरावर उभा असतानाच जीगरने त्याच्याजवळील रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. कारमधून मोठ्याने आवाज आल्याने सिंगने कारच्या दिशेने धाव घेतली. सिंगने कारचा दरवाजा उघडून बघितला असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जिगर दिसला. त्याने तात्काळ याची माहिती कुटूंबियांना आणि पोलिसांना देत जीगरला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेले. घटनेची वर्दी मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्याला जी. टी. रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरू असून जीगरने आत्महत्येसाठी वापरलेले रिव्हॉल्व्हर ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी सांगितले. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी जीगर आपल्या बांधकाम कंपनीच्या कार्यालयात गेला होता. तेथून तो बँकेत गेला. त्यानंतर जीगरने चालक सिंग याला कार मरीन ड्राईव्ह येथे नेण्यास सांगितल्याचे समोर आले असून आर्थिक अडचणीतून त्याने आत्महत्येचे हे पाऊल उचल्याची प्राथमिक तपासातून माहिती समोर येत आहे.