Sat, Apr 20, 2019 18:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ७५ वर्षांच्या वृद्धेची चाकूने वार करून हत्या

७५ वर्षांच्या वृद्धेची चाकूने वार करून हत्या

Published On: Feb 02 2018 1:44AM | Last Updated: Feb 02 2018 1:35AMमुंबई : प्रतिनिधी

गोरेगाव येथे मिरुबेन पटेल या 75 वर्षांच्या वृद्ध महिलेची बुधवारी सायंकाळी हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहेत. या हत्येमागील गूढ कायम असून घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली आहे का याचा पोलीस तपास करीत आहेत. 

मिरुबेन या गोरेगाव येथील मिठानगर, गावदेवी इमारतीच्या बी विंगच्या फ्लॅट क्र. 109 मध्ये त्यांचा मुलगा बलराजसोबत राहत होत्या. त्यांना एक मुलगी असून ती पती व मुलांसोबत बाजूच्याच विंगमध्ये राहते. बलराज हा विवाहीत असून पंधरा वर्षांपूर्वी त्याची पत्नी तीन मुलांसोबत त्याला सोडून गेली आहे. तो सध्या चर्चगेट येथील लायब्ररीत कामाला आहे. बुधवारी सकाळी तो कामावर गेला.

यावेळी त्याची आई मिरुबेन या एकट्याच घरी होत्या. सायंकाळी साडेसहा वाजता तो घरी आला तेव्हा फ्लॅटचा दरवाजा बाहेरुन कडी लावलेल्या स्थितीत दिसून आला. कडी उघडून आत प्रवेश केल्यावर त्याला त्याची आई मिरुबेन या बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची दिसली. तिच्या गळ्यावर चाकूने वार झाल्याचे दिसून येताच त्याने ती माहिती पोलिसांना दिली. यावर वपोनि धनाजी नलावडे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत मिरुबेन यांना सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी त्यांचा जावई अशोकसिंग जीवनसिंग यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली आहे का, हत्येमागे अन्य काही कारण आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत. प्राथमिक तपासात बलराज याच्या स्वभावामुळे मिरुबेन यांचे त्याच्याशी खटके उडत होते. त्यातून ही हत्या झाली आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत. बलराजला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र या चौकशीचा तपशील समजू शकला नाही.