Wed, Nov 13, 2019 12:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांना गुगलकडून आदरांजली

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांना गुगलकडून आदरांजली

Published On: Apr 30 2018 10:52AM | Last Updated: Apr 30 2018 10:52AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

आज भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांची १४८ वी जयंती आहे. त्‍या निमित्ताने गुगलने त्‍यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. गुगलने डुडलच्या माध्यमातून दादासाहेब फाळके यांना मानवंदना दिली आहे. 

गुगलने साकारलेल्‍या डुडलमध्ये तरुणपणातील दादासाहेब चित्रपटाच्या रिळाची पाहणी करताना दिसत आहेत. तसेच ते दिग्दर्शन, निर्मिती आणि कलाकारांना चित्रीकरणादरम्यान सूचना देत आहेत. 

दीडशे वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्‍हणजे ३० एप्रिल १८७० रोजी नाशिकमधील त्र्यंबक येथे गोविंदशास्त्री आणि द्वारकाबाई फाळके यांच्या पोटी दादासाहेबांचा जन्म झाला. मुंबईच्या मराठा हायस्कूलमधून मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण करून त्‍यांनी १८८५ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. १८९० साली बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले. कलेचे प्रचंड वेड असलेल्या फाळकेंनी चित्रकला, वास्तुकला, प्रोसेस फोटोग्राफी अशा अनेक कला आत्मसात केल्या. 

दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये भारतातील पहिला मुकपट 'राजा हरिश्चंद्र' बनवला. या मूकपटासाठी लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, रसायनकार, संकलनकार इ. सगळ्या भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या. त्यांनी आपल्या १९ वर्षांच्या चित्रपट निर्मितीत एकूण ९५ चित्रपट आणि २६ लघुपट बनवले. मोहिनी भस्मासूर, सत्यवान सावित्री, लंका दहण, कालिया दमन आणि श्रीकृष्ण जन्म हे त्‍यांचे त्‍याकाळी गाजलेले चित्रपट. 

Tags : Dadasaheb Phalke,  Indian cinema, Google, doodle, father