Sun, Apr 21, 2019 13:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारविरोधी वातावरणाचा लवलेशही नाही!

सरकारविरोधी वातावरणाचा लवलेशही नाही!

Published On: Aug 04 2018 1:40AM | Last Updated: Aug 04 2018 12:57AMमुंबई : उदय तानपाठक

मराठा आरक्षणावरून राज्यभर पेटलेले आंदोलन, कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी निर्माण केलेले वातावरण तसेच केंद्र आणि राज्य सरकार विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जनमत असल्याच्या चर्चांना सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकांच्या निवडणुकीच्या निकालांनी पूर्णविराम दिला आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपोावर सतत टिकेचे प्रहार करणार्‍या शिवसेनेला हे निकाल स्वबळावर लढून भाजपाला काटशह देण्याच्या मनसुब्यांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडनारे ठरू शकतात. विरोधकांच्या टिकेचे लक्ष्य बनलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपध्दतीवर मतदारांनी शिक्कामोर्तब केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जळगावात भाजपाला चांगले यश मिळेल, असा अंदाज होता, मात्र सांगलीत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी झाल्याने त्यांनाच फायदा होईल, अस वाटत होते. शिवाय सध्या सुरू असलेल्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा फटका भाजपाला सांगली महापालिकेत बसेल, असे राजकीय तज्ज्ञांना वाटत होते. प्रत्यक्षात निकाल मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का देणारेच लागले आहेत.

जळगाव हे उत्तर महाराष्ट्रातले राजकीयदृष्ट्या जागरूक शहर मानले जाते. आधी नगरपालिका आणि नंतर महापालिका स्थापन झाल्यानंतरदेखील या शहरावर सुरेश जैन यांची एकहाती पकड होती. जैन म्हणजे या शहराचे जणू भाग्यविधातेच असे चित्र असल्याने त्यांचेच वर्चस्व या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राहीले होते. चाळीस वर्षे या वर्चस्वाला कोणताही पक्ष धक्का लावू शकला नाही. याचे कारण जैन यांनी सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांना हाताशी धरले होते. सर्वच पक्षात त्यांचेच बगलबच्चे होते. खान्देश विकास आघाडी हा जैनांचा पक्ष होता, तिच्या माध्यमाततून त्यांनी आक्रमक राजकारण केले. जळगावचे पालिका मार्केट हे जैन यांच्या मनमानी कारभाराचे जणू स्मारकच बनले आहे.

कुणालाही धूप न घालता जैन आपल्याच पध्दतीने आणि स्वतःला हवा तसा कारभार करत होते, त्यामुळेच जळगावला त्यांनी घरकुल योजना आणली, तेव्हा हुडकोचे कर्ज घेतले, अजूनही जळगावकर हे कर्ज फेडत आहेत. दर महिन्याला या कर्जाचा चार कोटींचा हप्ता महापालिकेच्या तिजोरीतून द्यावा लागत आहे. जळगाव नगरपालिकेची महापालिका झाली, पण शहराला त्याचा काहीही फरक पडलेला नाही. अनधिकृत बांधकामे, त्यामुळे अरूंद झालेले रस्ते आणि शहरातले घाणीचे साम्राज्य हीच जैन यांची देणगी मानली जाते. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरूंगवास भोगणार्‍या जैन यांनी बाहेर येताच शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुक लढवली होती. 

या पार्श्‍वभूमीवर भाजपासाठी अनेक वर्षे जळगावची जमीन भाजपासाठी अनुकूल नव्हतीच. एकनाथ खडसे हे गेल्या चाळीस वर्षांपासून खान्देशात भाजपाच्या वाढीसाठी खस्ता खात आहेत. उत्तर महाराष्ट्रात खडसेंनी भाजपा रूजवला, वाढवला. विशेषतः जळगावात त्यांनीच आपल्या पक्षाची पाळेमुळे रोवली. खडसे हे जळगावच्या राजकारणाचे अविभाज्य अंग मानले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी पंगा घेतला, आणि पारडे फिरले. गिरीश महाजन यांना हाताशी धरून फडणवीस यांनी खडसेंची पाळेमुळे खोदून काढली. आता गिरीश महाजन हे जळगावचे भाई बनले आहेत. वास्तविक जैन आणि महाजन हे एकमेकांच्या जवळचे. खडसे यांना विरोध हा दोघांमधला समान धागा! त्यामुळेच खान्देश विकास आघाडीशी भाजपाने युती करावी असा जैन यांनी खूप प्रयत्न केला, मात्र एकनाथ खडसे यांनी तो हाणून पाडत भाजपाने वेगळेच लढावे अशी आग्रही भूमिका घेतली. खडसेंची हीच भूमिका आता फळाला आली आहे. जळगावच्या विजयाचे श्रेय गिरीश महाजनांना जसे आहे, तसेच खडसेंनाही द्यावे लागेल, हे खरे!

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पार चारीमुंड्या चित करून भाजपाने यश मिळवले आहे. खरे तर शेतकर्‍यांसह मराठा आंदोलनाचा परिणाम पश्‍चिम महाराष्ट्रातल्या या महत्वाच्या महापालिकेच्या निवडणुकीत दिसेल, असे वाटत होते. भाजपाविरोधात त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वत्र मोठी लाट असल्याचे चित्र काँग्रेस-राष्ट्रवादीने निर्माण केले होते. सरकारमद्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने तर रोजच फडणवीस यांना धारेवर धरण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळेच सांगलीत भाजपाला   फारसे यश मिळणार नाही, आणि आघाडीला सत्ता मिळेल, असा कयास राजकीय निरिक्षक बांधत होते.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्यानेच निवड झालेल्या जयंत पाटील यांनी या निवडणुकीत प्रतिष्ठाच पणाला लावली होती. गेली अनेक वर्षे एकहाती सत्ता असलेल्या काँग्रसशी राष्ट्रवादीने हातमिळवणी केली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या नेतृत्वगुणांची ओळख नव्याने करून दिली आहे असे म्हणावे लागेल. भाजपाने सर्वाधिक जागा मिळवत सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली. आपणच शेतकर्‍यांचे तारणहार असल्याचा आव आणणार्‍या शिवसेनेलाही मतदारांनी आसमान दाखवून स्वबळावर राज्यात लढण्याच्या स्वप्नाला सुरूंग लावला आहे.आता आपले स्वबळाचे स्वप्न बाजूला ठेवून भाजपाच्याच साथीने जाण्याचा विचार उध्दव ठाकरे यांना करावा लागणार आहे!