Sun, Nov 18, 2018 07:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोन्याचा उच्चांक!

सोन्याचा उच्चांक!

Published On: Jan 26 2018 1:35AM | Last Updated: Jan 26 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी 

सोन्याच्या भावात गेल्या पाच दिवसांत अचानक तब्बल 850 रुपये इतकी मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा (एक तोळा) भाव गुरुवारी 31 हजार 300 रुपयांवर पोहोचला आहे. 20 जानेवारीला हाच भाव 30 हजार 450 रुपये इतका होता. त्यामुळे ऐन लग्नसराईमध्ये दागिने खरेदी करणार्‍या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.

सोन्याच्या भावात 13 जानेवारीपासून चढ-उतार सुरू झाले. मात्र, 20 जानेवारीनंतर पाच दिवसांत सोन्याच्या भावाने 31 हजार 300 रुपयांचा पल्ला गाठला. तोळ्यामागेे तब्बल 850 रुपये  वाढल्यामुळे दागिन्यांचा भावही वधारला. 10 तोळे दागिने करण्यासाठी ग्राहकाला 8 हजार 500 रुपये जादा मोजावे लागणार असल्याने लग्नसराईचे बजेट 30 ते 40 हजारांनी वाढेल. येत्या काळात सोन्याच्या भावात आणखी चढ-उतार होणार असून 24 कॅरेटचा भाव आणखी 200 ते 250 रुपयांनी वाढण्याची शक्यता झवेरी बाजारामधील होलसेल व्यापारी जीतूभाई जैन यांनी व्यक्‍त केली. या दरवाढीचा सोन्याच्या विक्रीवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती पोपळे ज्वेलर्सचे व्यवस्थापक राजेश पाते यांनी व्यक्त केली.