Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोन्याच्या बिस्किटांचे आमिष, दोन फरार तरुणांना अटक

सोन्याच्या बिस्किटांचे आमिष, दोन फरार तरुणांना अटक

Published On: Sep 07 2018 1:05AM | Last Updated: Sep 07 2018 12:50AMमुंबई : प्रतिनिधी

सुमारे 24 लाख रुपयांच्या मोबदल्यात दोन किलो सोन्याची बिस्किटे देतो, अशी बतावणी करून फसवणूक करून पळून गेलेल्या दोन फरार आरोपींना बुधवारी माहीम पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.  त्यांच्याकडून पोलिसांनी एक कार आणि साडेपंधरा लाख रुपयांची रोकड जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वी याच गुन्ह्यात तिघांना पोलिसांनी अटक केली. तर या कटातील एक मास्टरमाईंड अद्याप फरार आहे.

तक्रारदार गणेश रमेश कदम हे दादर परिसरात कुटुंबीयांसोबत राहतात. शनिवारी ते माहीम येथे कामावरील एका सहकारी मित्राला भेटायला गेले होते. या मित्रासोबत ते रहेजा हॉस्पिटलजवळील नागोरी हॉटेलजवळ आले. यावेळी या मित्राने त्याच्या परिचित एक व्यक्ती त्यांना स्वस्त दरात सोन्याची बिस्कीटे मिळवून देईल. दोन किलो सोन्याची बिस्किटे अवघ्या 24 लाख 50 हजार रुपयांमध्ये मिळतील असे सांगितले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी काही बिस्किटे खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांच्याकडून या पाचही आरोपींनी 24 लाख 50 हजार रुपये घेतले.  ही रक्कम घेतल्यानंतर ते सर्वजण तेथून पळून गेले होते. बराच वेळ होऊन आरोपी सोन्याची बिस्कीटे घेऊन आले नाहीत. त्यामुळे त्यांना संशय आला. 

त्यानंतर त्यांनी माहीम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या पाचही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांच्या पथकाने बहादूर अन्वर अली शेख ऊर्फ रोहित ऊर्फ छोटू, फैजान मोहम्मद हुसैन शेख आणि आसिफ इम्रानअली तुर्के या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्यांना पोलिसांनी अटक केली. 

या गुन्ह्यांत अन्य एका आरोपीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तोच या कटातील मुख्य सूत्रधार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांनी सांगितले. गुन्ह्यांतील तीन फरार आरोपींकडे रक्कम असल्याने त्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांच्या पथकातील तुकाराम जगताप, खराडे, कणसे, सातव, वाणी, अमोल नलावडे यांनी पाचपैकी बहादूर शेख, फैजान शेख आणि आसिफ तुर्के-पाटीलसह त्याच्या चालकाला बुधवारी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील शेवरोलेट एंजॉय कार आणि 15 लाख 58 हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे.