Tue, Mar 19, 2019 05:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छत्तीसगडचा गोल्ड मेडलिस्ट डॉ. सेठी गजाआड

छत्तीसगडचा गोल्ड मेडलिस्ट डॉ. सेठी गजाआड

Published On: Feb 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 01 2018 1:15AMठाणे : खास प्रतिनिधी

बोगस कंपन्या स्थापन करून चिटफंडच्या माध्यमातून देशभरात सुमारे एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा आर्थिक घोटाळा करणारा आणि सीबीआय, सेबीच्या रडारवर असलेला छत्तीसगडमधील गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर प्रिथीपाल रामसिंग सेठी (63) याला ठाणे गुन्हे अन्वेषण युनिट एकच्या पथकाने ठाण्यातून अटक केली आहे. त्याला ठाणे न्यायालयाने 6 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली असून त्याच्या विरोधात छत्तीसगडसह पश्चिम बंगालमध्येही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. 

मुंबईतील जोगेश्वरीमधील एकता को-ऑप. सोसायटीत राहणारा डॉ. सेठी याने छत्तीसगडमधील महासमुद्र जिल्ह्यातील तुमगांवमध्ये वामसी केमिकल्स कंपनीतील कामगार शिवानंद मिश्रा (51) रा. उत्तर प्रदेश याला टोबो रिटेल मार्केट लिमी. कंपनीचा संचालक म्हणून नियुक्ती केली आणि चिटफंडद्वारे गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. गुंतवणूकदारांना परतावा देण्याची वेळ आल्यानंतर सेठी याने कंपनीला टाळे लावत पोबारा केला. याप्रकरणी 21 डिसेंबर 2015 रोजी छत्तीसगडच्या तुमगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

गेल्या दोन वर्षांपासून सेठी हा मुंबई आणि ठाणे परिसरात  राहत असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांनी ठाणे पोलिसांना दिली. त्यानुसार ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सेठी याला पकडण्यासाठी पथक बनवले. सेठी हा भिवंडी बायपास रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी पोहोचले. मात्र तो सापडला नाही. अखेर सेठी याला ठाणे बस स्थानक परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. छत्तीसगडमधील गुन्ह्यात सेठी याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून सेठीच्या अटकेबाबत छत्तीसगड पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. सेठी याच्याविरुद्ध पश्चिम बंगालमध्येही गुन्हे दाखल असून त्याने केलेली फसवणुकीचा आकडा हजार कोटीपेक्षा अधिकचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. सीबीआयची गुवाहटी शाखा तसेच सेबी देखील त्याची चौकशी करत आहेत.

एमडी असलेला डॉ. सेठी हा लखनऊ मेडिकल कॉलेजमधील गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर आहे. किडनी स्पेशालिस्ट आहे. त्याचे नवी मुंबईत तुर्भे येथेही एक कार्यालय आहे. त्याने देशातील विविध भागात बोगस कंपन्या स्थापन करून त्याचे शेअर विकले आहेत. त्याने चिटफंडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला असल्याची माहितील पोलिसांनी दिली.