Sat, Jun 06, 2020 05:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोकुळमधील नोकरभरतीत मंत्री जानकरांची मनमानी

गोकुळमधील नोकरभरतीत मंत्री जानकरांची मनमानी

Published On: Aug 31 2018 2:09AM | Last Updated: Aug 31 2018 1:29AMमुंबई : प्रतिनिधी 

कोल्हापूरच्या गोकूळ दुधसंघाच्या कर्मचारी नोकर भरतीत हस्तक्षेप करून पशु, दुग्ध आणि मस्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेची उच्च न्यायालयाने गुरूवारी गंभीर दखल घेतली.न्या.भूषण गवई आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने याप्रकरणी मंत्री जानकर यांच्यासह प्रतिवाद्यांना तीन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

या नोकरभरतीत पशु, दुग्ध आणि मस्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी सुरूवातीला दिलेली स्थगिती आणि दोन आठवड्यात पुन्हा स्थगिती उठविण्याचा मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अ‍ॅड. अनिल अंतुरकर आणि वकील तानाजी म्हातुगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण गवई  आणि न्यायमूर्ती  एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. अनिल अंतुरकर यांनी युक्तीवाद केला. 

गोकुळ दुधसंघाने कर्मचार्‍यांच्या नोकरभरती संबंधी प्रादेशिक सहसंचालक, को.ऑप. सोसायटी (डेअरी) यांना 19 जानेवारी 2018 रोजी प्रस्ताव पाठविला. हा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी 2016-17 च्या लेखापरिक्षण अहवालात (ऑडिट रिपोर्ट) मागच्या वर्षीचा एकहजार 69 पदांपैकी तब्बल 546 कर्मचार्‍यांचा अनुषेश भरला नसल्याचे ताशेरे ओढण्यात आले. अनुशेष न भरता करण्यात येत असलेल्या नोकरभरती विरोधात केलेल्या तक्रारीची पशु, दुग्ध आणि मस्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी दखल घेऊन 20 जून 18 रोजी नोकरभरतीला स्थगिती दिली. मात्र 2 आठवड्यानंतर लगेचच अंतरिम दिलासा देत, 3 जुलै 18रोजी ही स्थगिती उठवत भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली नाही, असा आरोप केला. 

मंत्र्यांनी स्थगती आदेश उठविल्यानंतर कोणत्याही प्रकारची जाहिरात न देता एकाएकी नोकर भरती केली. याबाबत पुन्हा पाटील यांनी तक्रार करताच, त्याला 19 जुलै रोजी स्थगिती दिल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना केवळ जानकर यांनी गोकुळ दुध संघ आणि भाजप पक्षाच्या दबाबाखाली 3 जुलै रोजीची स्थगिती उठविल्याचा आरोप केला. नोकरभरतीसाठी पात्र उमेदवारांना मागील तारखेचे नियुक्तीपत्र देण्याचा प्रकारही दबावातून केला असावा असा संशय व्यक्त केला.