Thu, Apr 25, 2019 07:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दारू दुकानांना देव-देवतांची, महिलांची नावे चालणार

दारू दुकानांना देव-देवतांची, महिलांची नावे चालणार

Published On: Mar 06 2018 1:50AM | Last Updated: Mar 06 2018 1:20AMयेवला : अविनाश पाटील

दारू विक्री व बिअर दुकानांना आता देवांची व महिलांची नावे चालणार आहे. या दुकानांना नावे कोणती द्यावी याबाबत उलटसुलट चर्चा असून महापुरुषांची तसेच गडकिल्ल्यांची नावे या दुकानांना देऊ नये, या मागणीवर अशा नावांसह देवीदेवता व महिलांच्या नावावरही बंदी घालण्याचे निर्णय मागील वर्षी नोव्हेंबर 2017 मध्ये घेण्यात आला होता. परंतु राज्यातील बिअर बार आणि दारू विक्री केंद्रांना महापुरुष, देव-देवता, गडकिल्ले व महिलांची नावे देण्यास प्रतिबंध करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली असून मात्र यातून फक्त महापुरुष व गडकिल्ले यांची नावे या बिअर बार व दारू दुकानांना देण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे , हा प्रतिबंध देव-देवता व महिलांच्या नावासाठी  नसल्याचे विधान परिषदेत दिलेल्या तारांकित प्रश्‍नाच्या उत्तरामुळे समोर आले आहे.

राज्यातील बिअर बार, दारूचे दुकान आणि परमिट रूमला महापुरुषांची तसेच गडकिल्ल्यांची नावे दिली जातात. हा महापुरुषांचा अवमान असून राज्याच्या संस्कृतीला शोभणारे हे चित्र नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी मागील वर्षी मार्चमध्ये विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे देशी दारू, बिअर बारला महापुरुषांचे नाव न देण्याची मागणी केली होती.

आमदार अमरसिंह पंडित यांच्या सूचनेनंतर उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगार विभाग आणि उत्पादन शुल्क खात्यातील अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. नोव्हेंबर 2017 मध्ये या समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये देशी दारूची दुकाने, बिअर बार आणि परमिट रूमला महापुरुषांची तसेच देवी-देवता आणि गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत कामगार विभाग कायद्यात सुधारणा करणार असल्याचे व मुंबई प्रोव्हिजन अ‍ॅक्टमध्ये बदल केले जातील व याबाबत अधिसूचना काढण्यात येणार असल्याचेही सांगितले होते.