Mon, May 20, 2019 10:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोवा, मध्य प्रदेश, राजस्थानही घेणार महारेराचे धडे

गोवा, मध्य प्रदेश, राजस्थानही घेणार महारेराचे धडे

Published On: Sep 03 2018 1:40AM | Last Updated: Sep 03 2018 1:24AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या महारेरा कायद्याची अंमलबजावणी इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात अधिक चांगल्या प्रमाणात होत असल्यामुळे केंद्राच्या आदेशावरून राज्याने आतापर्यंत गुजरात, उत्तर प्रदेश, आणि छत्तीसगडमधील अधिकार्‍यांना रेराच्या कामकाजाची माहिती दिली आहे. आता  राजस्थान, दमण-दीव, गोवा व मध्य प्रदेशला महाराष्ट्राकडून या कायद्याचे धडे दिले जाणार आहेत.

केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या वतीने 10 सप्टेंबर रोजी पुणे येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत महाराष्ट्राचे अधिकारी इतर राज्यांना रेराच्या अंमलबजावणीविषयी माहिती देणार आहेत. केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरीदीप पुरी हे या कार्यशाळेचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यशाळेत गोवा, दीव दमण, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या रेरा अधिकार्‍यांचा समावेश आहे. महारेराचे सचिव वसंत प्रभू म्हणाले, आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणार्‍या नागरिकांना विकासकांच्या धोकेबाजीला सामोरे जावे लागते. त्यामुळे सामान्य ग्राहकांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यासाठी केंद्र सरकारने विकासकांवर अंकुश आणणारा रेरा कायदा लागू केला.  या कायद्याची महाराष्ट्राने प्रभावी अंमलबजावणी केली आहे. केंद्र सरकारच्या या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांनी आपापल्या पध्दतीने तो लागू करायचा होता. त्यामुळे विकासकांवर अंकुश ठेवण्यामध्ये महाराष्ट्राने चांगले मॉडेल तयार केले आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, तेलंगणा, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील अधिकार्‍यांनी महाराष्ट्रात येवून हे शिकण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या रेरा वेबसाईटचे काम पाहणार्‍या महाऑनलाईन या कंपनीला गोवा सरकारने आपल्या राज्याची बेवसाईट तयार करण्यासाठी संपर्क साधला आहे. तर रेराच्या कामाची माहिती घेण्यासाठी युपी रियल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीचे अध्यक्ष राजीव कुमार यांच्यासह सदस्य बलविंजर सिंह, भानुप्रताप सिंह, कल्पना मिश्रा हे नुकतेच मुंबईत आले होते. दोन दिवस त्यांनी महारेराची माहिती घेतल्याचे प्रभू यांनी सांगितले. आता विकासकांना आपल्या बांधकाम प्रकल्पाच्या पूर्ण माहितीसह या प्रकल्पाची नोंदणी महारेरामध्ये करणे अनिवार्य आहे. यामुळे विकासक कालांतराने ग्राहकांना फसवू शकत नाहीत.