Thu, Jun 20, 2019 07:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चाकरमान्यांनो... गावी निघालात, व्हाया कोल्हापूर मार्ग उत्तम !

चाकरमान्यांनो... गावी निघालात, व्हाया कोल्हापूर मार्ग उत्तम !

Published On: Sep 12 2018 2:07AM | Last Updated: Sep 12 2018 2:07AMमुंबई : प्रतिनिधी 

गणपतीला कोकणात जाण्यासाठी लाखो चाकरमानी निघाल्यामुळे मुंबई-गोवा मार्गावर सोमवारपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे सिंधुदर्ग जिल्ह्यात जाणार्‍या चाकरमान्यांनी व्हाया कोल्हापूर मार्ग निवडल्यास आपला प्रवास सुखाचाच नाही तर, जलद होणार आहे. मग विचार करू नका,  चला व्हाया कोल्हापूर मार्गे आपल्या गावी जाऊ

गणपतीला कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यावेळीही लाखो चाकरमानी रविवारपासूनच आपल्या गावी जाण्यास निघाले आहेत. जादा एसटीसह रेल्वे, खाजगी बस कमी पडल्या आहेत. अनेकजण भाड्याने छोट्या गाड्या आरक्षित करून गावी जाण्यास निघाले आहेत. कोकणातील सिंधूदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील गावांमध्ये जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग जवळचा आहे. पण महामार्ग छोटा असल्याने येथे नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते.  गणपतीत हजारो वाहने याच रस्त्याचा वापर करत असल्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होती. 

एसटीने सोडलेल्या जादा बस या विदर्भ, मराठवाडा आदी भागातील असून त्यांचे चालकही त्याच भागातील आहेत. त्यांना कोकणातील घाटरस्त्याचा फारसा अनुभव नसल्यामुळे त्या बस एकापाठोपाठ जातात. त्यात अनेक खाजगी बस कोकणात सोडल्या जातात. त्यामुळे पनवेलपासून थेट रत्नागिरी हातखंबापर्यंत वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या तालूक्यातील गावांमध्ये जाण्यासाठी व्हाया कोल्हापूर हा सोयीचा महामार्ग आहे. 

असे जा कोल्हापूर मार्गे 

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेने पुणे बायपास रोड पकडून पुढे पुणे बंगलोर महामार्गाने कोल्हापूर शहरात शिरावे. पुढे रंकाळा तलावाकडून राधानगरी फोंडा घाटामार्गे फोंडा येथे येऊन, कणकवली, देवगड, कसाल, कुडाळ येथे जाता येते. तर गगनबावडा मार्गे करूळ घाटातून वैभववाडी येथे पोहचता येते. तेथून वैभववाडी तालुक्यातील गावांसह कणकवली, देवगड, विजयदुर्ग, तरळा व राजापूर तालूक्यातील गावांमध्ये जाण्यासाठी चाकरमान्यांना हा सोयीचा मार्ग आहे. तिसरा मार्ग आंबोली घाटातून सावंतवाडी येथे जाता येते. पण हा मार्ग निवडताना कोल्हापूर शहरात न जाता बंगलोर महामार्गाने निपाणी मार्गे पुढे आंबोली घाट पकडून सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कुडाळा, दोडामार्ग या तालुक्यातील गावांमध्ये जाण्यासाठी हा सोयीचा रस्ता आहे.

पाली मार्गही निवडू शकता

पनवेल मार्गे मुंबई-गोवा मार्ग पकडायचा झाल्यास पनवेल ते वडखळ नाक्यापर्यंत होणार्‍या वाहतूक कोंडीचा त्रास चाकरमान्यांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे  सुमारे 40 किमीचे हे अंतर कापण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. त्यामुळे चाकरमान्यांनी ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेने खोपोली टोलनाका ओलाडल्यानंतर सुमारे 100 ते 150 मीटर अंतरावर पालीला जाण्यासाठी डाव्याबाजूस मार्ग आहे. या मार्गे गेल्यास पाली व पुढे गोवा हायवेला जाता येते.