Wed, Apr 24, 2019 22:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सांस्कृतिक धोरणात योग्य स्थान द्या!

सांस्कृतिक धोरणात योग्य स्थान द्या!

Published On: Jun 16 2018 1:30AM | Last Updated: Jun 16 2018 1:19AMसुधा करमरकर रंगमच मुलुंड : अनुपमा गुंडे

राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवितांना कलाकारांची मातृसंस्था म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषदेला योग्य ते प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी परिषदेच्या वतीने 98 व्या नाट्य संमेलनाच्या खुल्या आधिवेशनात ठरावाद्वारे केली. 98 व्या अखिल भारतीय नराठी नाट्य परिषदेचा समारोप शुक्रवारी मुलुंड येथे झाला. त्यावेळी खुल्या आधिवेशात परिषदेच्या वतीने 5 ठराव मांडण्यात आले. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही रंगभूमी आणि सर्व कलांशी संबंधित महाराष्ट्रातील समावेशक 27 हजार सभासद असलेल्या एकमेव संस्थेला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण निश्चित करण्यात मातृसंस्था म्हणून योग्य ते प्रतिनिधित्व व  स्थान द्यावे अशी मागणी करणारा ठराव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नाथा चितळे यांनी ठराव मांडला. या ठरावास सतीश शिंगटे यांनी अनुमोदन दिले. हौशी राज्य नाटय स्पर्धेसाठी केंद्र समन्वयक म्हणून नाट्य परिषदेच्या स्थानिक प्रतिनिधींची निवड करण्यात यावी, स्पर्धेच्या संयोजनात परिषदेचा सहभाग असावा, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळात प्रतिनिधित्व नसल्याने नाट्यलेखक व रंगकर्मींना प्रयोग सादर करण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागतो, शासनाने याची दखल घेवून प्रत्येक जिल्ह्याला रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी आधिवेशनात करण्यात आली.

रंगभूमी विषयक चळवळ ग्रामीण आणि तालुका पातळ्यावर जोमाने विकसित होण्यासाठी नाट्य परिषदेच्या शाखा असतील त्या ठिकाणी शासनाच्या सांस्कृतिक कला संचालनयाच्या दरवर्षी नाट्य प्रशिक्षण, विविध प्रकारची शिबिरे, कार्यशाळा परिषदेच्या समन्वयाने घेण्यात याव्यात, अशीही मागणी ठरावात करण्यात आली. याखेरीज 60 तास सलग नाट्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल परिषदेच्या मुलुंड शाखेचे अभिनंदन करण्यात आले. दिवंगत रंगकर्मींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. रंगभूमीशी निगडीत सन्मान प्राप्त करणार्‍या कलाकारांच्या अभिनंदनाच्या ठराव मांडण्यात आला. या ठरावांचे वाचन कृष्णा जाघव, संजयकुमार दळवी, शेखर बेंद्रे, नाथा चितळे यांनी केले. या ठरावांना प्रफुल्ल कारेकर, सुरेंद्र गुजराथी, नरेश गडेकर, शिवाजी शिंदे, सतीश शिंगटे यांनी अनुमोदन दिले.