Wed, Jun 26, 2019 17:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन सुविधा द्या : मुख्यमंत्री 

साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन सुविधा द्या : मुख्यमंत्री 

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:34AMमुंबई : प्रतिनिधी

साखरेचे बाजारातील दर घसरल्याने ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार दर देणेही अवघड झाले आहे. हे लक्षात घेता शेतकर्‍यांची देणी भागविण्यासाठी कारखानदारांना सॉफ्ट लोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच कर्ज परतफेडीचा कालावधी आणखी दोन वर्षांनी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत रविवारी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत साखरेच्या विक्रमी उत्पादनामुळे निर्माण झालेल्या प्रश्‍नाकडे प्रामुख्याने लक्ष वेधले. साखरेचे देशात एकूण उत्पादन 31.7 दशलक्ष टन इतके असून, त्यात महाराष्ट्राचा वाटा हा 10.7 दशलक्ष टन इतका असल्याचे ते म्हणाले.

सारखेचे निर्यात मूल्य आणि भारत सरकारद्वारा प्रतिटन 55 रुपये सबसिडीची रक्कम प्राप्त होईपर्यंत मार्जिन मनीसाठी बँका, तसेच वित्तीय संस्थांनी आग्रह धरू नये, असे निर्देश रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड यांनी द्यावेत. उसापासून केवळ सारखेऐवजी बी-हेवी मोलासिसपासून इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. यामुळे इथेनॉलपासून इंधन तयार करण्याच्या प्रक्रियेलासुद्धा गती येईल, असे फडणवीस त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राने शेती आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली असून, परिणामी सकल घरेलू उत्पादनाचा (जीएसडीपी) वृद्धी दर हा 2014-15 पासून 8.3 टक्क्यांपर्यंत आला आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अनेक उपाय हाती घेण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार अभियानातून 13,160 गावे दुष्काळमुक्त करण्यात आली आहेत. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून 31,459 तलाव निवडण्यात आले असून, आतापर्यंत 1,981 तलावांतून 92 लाख क्यूबीक मीटर गाळ काढण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.