Sun, Mar 24, 2019 16:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क, व्हॅट कमी करून लोकांना दिलासा द्या’ 

‘पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क, व्हॅट कमी करून लोकांना दिलासा द्या’ 

Published On: Sep 09 2018 5:40PM | Last Updated: Sep 09 2018 5:40PMमुंबई : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या  तेलाचे दर वाढल्याचे सांगत पेट्रोल-डिझेलची अन्यायकारक दरवाढ सामान्य जनतेवर लादली जात आहे. सरकारला जर खरोखरच सामान्य जनतेची काळजी असेल त्यांनी पेट्रोल-डिझेल जीएस्टीच्या कक्षेत आणावे, तोपर्यंत इंधनावरील उत्पादन शुल्क, व्हॅट कमी करून लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काँगेस आघाडीच्या काळात 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 110  रुपये प्रति बॅरल होते, त्यावेळेस पेट्रोल 80 तर डिझेल 76 रुपये लिटर होते. पण आज कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 80 डॉलर असताना पेट्रोल 87 तर डिझेल 76 रुपये कसे काय? हा मोठा प्रश्न आहे. इंधनावर छुपे कर लावून सरकार तेल कंपन्या व आपली तोजीरी भरण्याचे काम करत असून, ही दरवाढ सरकारने मागे घेऊन सामान्य जनतेला दिलासा द्यावा यासाठी सोमवार दि. 10 सप्टेंबर रोजी काँग्रेसने भारत बंद पुकारला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पार्टी, डावे पक्ष तसेच मनसे सहभागी होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

बंदसाठी शिवसेनेशी संपर्क, पण उत्तर नाही
पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि महागाईच्या विरोधात देशपातळीवर पुकारलेला बंद ही लोकांसाठीची लढाई असल्याने शिवसेनेने देखील सहभागी व्हावे यासाठी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्याशी आपण दोनवेळा संपर्क साधून चर्चा केली, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याशी आपण चर्चा केली. त्यांनी भारत बंदमध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याचे जाहीर केल्याचे चव्हाण म्हणाले.