Tue, Apr 23, 2019 00:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या 

कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या 

Published On: Aug 25 2018 1:40AM | Last Updated: Aug 25 2018 1:40AMआसनगाव : वार्ताहर

मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी शहापूर येथे शुक्रवारी झालेल्या राज्यातील पहिल्या कुणबी आरक्षण परिषदेत करण्यात आली.या परिषदेसाठी ठाणे, पालघर, कोकण, खान्देश येथील सर्वपक्षीय नेते तसेच कुणबी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ही लढाई राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाची लढाई असल्याचे कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी  सांगितले. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना मिळालेले 27 टक्के आरक्षण महाराष्ट्रात लागू करावे, ओबीसी आरक्षणात घटनेत तरतूद असल्याप्रमाणे कुणबी समाजाला संख्येनुसार 45 टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे, पेसा क्षेत्रात 3 व 4 श्रेणीत 100 टक्के नोकरीतील आरक्षणात कुणबी समाजाला संख्येनुसार 35 टक्के आरक्षण द्यावे, सन 2000 पूर्वी असलेली महाराष्ट्रातील 3 व 4 श्रेणीतील नोकरीतील जिल्हाबंदी लावून 100 टक्के स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे, पेजे आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र 500 कोटींची तरतूद करून व व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून द्यावे, आदी  मागण्या या परिषदेत करण्यात आल्या. या परिषदेत माजी आमदार दिगंबर विशे, राष्ट्रवादीचे दशरथ तिवरे, युवराज पाटील, शरद पाटील, पराग पष्टे, काशिनाथ तिवरे, रवी चंदे, रवी पाटील, प्रकाश भांगरथ, विद्याताई वेखंडे, हरिभाऊ खाडे, बबन हरणे, अपर्णा खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

बिगर आदिवासी मुद्दा ऐरणीवर

शहापूर तालुक्यात बिगर आदिवासी समाज 65 % असतानाही पेसा क्षेत्र घोषित झाल्यामुळे येथील बिगर आदिवासींच्या नोकर्‍या मोठ्या प्रमाणात गेल्या. त्यामुळे बिगर आदिवासींबरोबर कुणबी समाजाचेही मोठे नुकसान झाल्याचे मत बिगर आदिवासी हक्क समितीचे काशिनाथ तिवरे यांनी व्यक्त केले.