होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या

कर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या

Published On: May 06 2018 1:58AM | Last Updated: May 06 2018 1:58AMमुंबई : प्रतिनिधी

खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे आणि खत पुरवठ्याचे योग्य ते नियोजन करण्यात आल्याने तुटवडा पडणार नाही. शेतीच्या चांगल्या उत्पन्नासाठी बियाणे आणि खताचा पुरवठा करण्याबरोबरच शेतकर्‍यांची आर्थिक गरज पूर्ण करण्याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे. ज्या शेतकर्‍यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे, अशांना नव्याने कर्जपुरवठा करण्यावर भर द्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप हंगाम बैठकीत दिले.

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत रंगशारदा सभागृहात पार पडली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पदुम मंत्री महादेव जानकर यांच्यासह मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, रिझर्व्ह बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि ‘नाबार्ड’चे अधिकारी उपस्थित होते.

खरीप हंगाम राज्यातील शेतकर्‍यांसाठी मोठा हंगाम असतो. या हंगामात  शेतकर्‍यांना शेतीत गुंतवणुकीसाठी अर्थसहाय्याची गरज भासते. हे लक्षात घेता खरीपासाठी पीक कर्जाचा पुरवठा मिशन मोडवर करावा. जिल्हाधिकार्‍यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज राष्ट्रीयीकृत व व्यावसायिक बँकांनी कृषी पत पुरवठ्याच्या बाबतीतील उदासीनता झटकून कर्जपुरवठा करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

गेल्यावर्षी 30 टक्क्यांनी पर्जन्यमान कमी होऊनही गेल्या दहा वर्षांतील सरासरी चांगले उत्पादन घेऊ शकलो, त्याचे कारण म्हणजे राज्यात जलसंधारणाची प्रभावीपणे झालेली कामे. पीक उत्पादन वाढीतील जलसंधारणाचे महत्त्व ओळखून येत्या महिन्याभरात राज्यात जलयुक्त शिवारची कामेही युद्धपातळीवर पूर्ण करावीत. दोन राज्यातील कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढविण्याची गरज असून, त्यासाठी शेतीत विविध तंत्रज्ञानाचा वापर करावा, कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे दुष्टचक्र संपुष्टात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

कृषी विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका योजना

कृषी विद्यापीठांनी केलेले नियोजन प्रत्यक्षात येण्यासाठी यंत्रणेने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका ही योजना तयार करावी. या माध्यमातून विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना कृषी विभागासोबत प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन शेतकर्‍यांना हवामान बदलाच्या सूचना, केलेले नियोजन याबाबत जागरूक करावे. कृषीच्या योजना प्रत्यक्ष शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा व त्याचा फीडबॅक द्यावा. त्यासाठी मोबाईल अ‍ॅपदेखील तयार करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावर्षी तुरीचे क्षेत्र वाढणार

राज्यात खरिपाचे ऊस पिकासह सरासरी क्षेत्र 149.74 लाख हेक्टर असून तृतीय अनुमानानुसार शंभर टक्के क्षेत्रावर मागील हंगामात पेरणी झाली असून, 0.31 टक्के वाढ दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने मका, मूग, उडीद, ऊस या पिकांचा समावेश आहे. भात, ज्वारी, बाजरी, तूर, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन व कापूस या पिकांत घट झाल्याचे दिसून येते. यावर्षी तुरीचे क्षेत्र वाढणार असल्याचे विजय कुमार यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी ज्या भागात रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे झाली आहेत, तेथे अग्रक्रमाने ठिबक सिंचनाच्या सोयी द्याव्यात, असे ते म्हणाले.